चंद्रपूर : एसटी चालकावर हल्ला केल्याप्रकरणी वरोरा तालुक्यातील मोखाळा येथील संजय प्रकाश अडसपुरे याच्याविरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा आगाराची बस मोखाळा येथे वळवत असताना रस्ता मोकळा करण्यावरून वाद झाल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. चालक रमेश कुमरे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (रविश सिंग पासून मला व माझ्या कुटुंबाला धोका, वाचा)
वरोरा आगाराची एसटी बस मोखाळा येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून परतीच्या प्रवासासाठी वळवत असताना, रस्ता मोकळा करण्याच्या क्षुल्लक कारणावरून थेट कर्तव्यावरील बस चालकावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात संजय प्रकाश अडसपुरे याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, अश्लील शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी चालकावर हल्ला कसा झाला? मोखाळा येथील घटना
पोलीस सूत्रांकडून आणि प्रथम खबर अहवालातून मिळालेल्या सखोल माहितीनुसार, फिर्यादी रमेश फकरुजी कुमरे (वय ४९, रा. ओंकार नगर, एकार्जुना, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी वाहक सुशील रमेश गायकवाड यांच्यासह वरोरा आगारातून शेड्यूल क्रमांक २१/२२ (वरोरा ते खांबाडा-सुसा मार्ग) नुसार राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक ‘एमएच ४० वाय ५४१२’ घेऊन प्रवाशांसह रवाना झाले होते. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास बस मोखाळा येथे पोहोचली. तेथे प्रवाशांना खाली उतरवून परतीच्या मार्गाने जाण्यासाठी बस टर्निंगवर वळवत असताना, बसच्या समोरच्या रस्त्यावर तिघे जण उभे असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
वरोरा आगार बस चालकाची शेगाव पोलिसांत तक्रार, एसटी चालकावर हल्ला
रस्त्यावरून बाजूला होण्याबाबत चालकाने तीन ते चार वेळा विनंती केली; मात्र यातील एका व्यक्तीने संतापाच्या भरात अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत चालकाला बसच्या खाली उतरण्यास फर्मावले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने चालकाच्या बाजूचे दार उघडून शर्ट धरत त्यांना जबरदस्तीने बसखाली ओढले. एवढ्यावरच न थांबता त्याने शर्टची कॉलर पकडून चालकाच्या गालावर थापड लगावली आणि ‘या गावात बस लावायची नाही, तुझ्या बसची तोडफोड करतो’, अशी उघड धमकी देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळादरम्यान गावातील महिला पोलीस पाटील पोटे घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी मध्यस्थी करून समज दिल्यानंतर संबंधित इसम तेथून निघून गेला.
घडलेल्या प्रकारानंतर महिला पोलीस पाटील पोटे यांच्याकडून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचे नाव संजय प्रकाश अडसपुरे (रा. मोखाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फिर्यादी रमेश कुमरे यांनी वाहक सुशील गायकवाड यांच्यासोबत शेगाव (बु.) पोलीस ठाणे गाठून तोंडी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२ (शासकीय सेवकास कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला किंवा बळाचा वापर), कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा शिवीगाळ) आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक निशा गजानन भुते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष ब्रिजराज निषाद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ग्रामीण भागात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे चालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






