चंद्रपूर आरोग्य सुविधांबाबत मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेताना आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण; आमदारांनी घेतली मंत्र्यांची भेट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 26, 2026

  चंद्रपूर : चंद्रपूर आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्याची मागणी केली. चंद्रपुरातील महिला रुग्णालय लवकर सुरू करावे, अशीही मागणी करण्यात आली. ३० खाटांची ग्रामीण रुग्णालये ५० खाटांची करण्याचा मुद्दाही मांडण्यात आला. (चंद्रपुरात उभे राहणार मराठी भाषा भवन, वाचा बातमी)

चंद्रपूर आरोग्य सुविधांबाबत मंत्र्यांशी चर्चा

जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण व्हावे, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करून प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी या भेटीत केली.

चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य सुविधांवर मोठा ताण येत आहे. परिणामी, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना अनेकदा उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढविणे, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणेतील प्रलंबित प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे आमदार जोरगेवार यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

आगामी चंद्रपूर दौऱ्यात आरोग्य मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या भेटीदरम्यान रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधा, पायाभूत व्यवस्था, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा आणि आवश्यक सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी भूमिका आमदार जोरगेवार यांनी मांडली.

चंद्रपूर शहरातील महिला रुग्णालयाचा विषयही त्यांनी प्राधान्याने उपस्थित केला. महिलांना प्रसूती, स्त्रीरोग आणि इतर आवश्यक उपचारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील महिला रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून महिलांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचारांची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

यासोबतच जिल्ह्यातील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांची क्षमता वाढवून ती ५० खाटांची करण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या पाहता सध्याच्या खाटांची संख्या अपुरी पडत असून, रुग्णांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी रुग्णालयांची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनस्तरावर ठोस आणि सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment