तळोधी रेती तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेले दोन १६ चाकी ट्रक

एकाच नंबर प्लेटवर दोन १६ चाकी ट्रक; तळोधी पोलिसांनी रेती तस्करी पकडली, आरोपींचे नाव गुमनाम

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 28, 2026

तळोधी : तळोधी रेती तस्करी प्रकरणात पोलिसांनी दोन १६ चाकी ट्रक आणि २० ब्रास रेती जप्त केली. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी तळोधी-बाळापूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दोन्ही ट्रकवर एकच बनावट नंबर प्लेट आढळली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५६ लाख रुपये असून, सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फसवणूक प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गडचांदूर पोलिसांची मुंबईत धडक, आरोपीला अटक)

एकाच क्रमांकाची बनावट नंबर प्लेट लावून अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव तळोधी पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान उधळून लावला आहे. दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी दोन १६ चाकी ट्रक आणि २० ब्रास रेती असा एकूण ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोधी रेती तस्करीचा प्रकार नाकाबंदी दरम्यान उघड

मिळालेल्या माहितीनुसार, तळोधी पोलीस पथक दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी तळोधी ते बाळापूर मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, रेतीने भरलेले दोन १६ चाकी ट्रक एकापाठोपाठ येताना पोलिसांच्या नजरेस पडले. संशय बळावल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष दोन्ही ट्रकांची सखोल तपासणी केली असता, दोन्ही वाहनांवर ‘MH-17-CV-9977’ या एकाच क्रमांकाची नंबर प्लेट लावण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

पोलिसांनी वाहनांची कागदपत्रे तसेच चेसिस आणि इंजिन क्रमांकांची पडताळणी केली तेव्हा हा संपूर्ण बनावट प्रकार उघडकीस आला. पहिल्या ट्रकचा चेसिस क्रमांक (MAT820003PIB6077) आणि इंजिन क्रमांक (B67B6A250002132B64272504) तपासणीत योग्य आढळून आला; मात्र दुसऱ्या ट्रकचा चेसिस क्रमांक (MAT541203K3C55442) आणि इंजिन क्रमांक (91C63778811) वेगळा असल्याचे स्पष्ट झाले. वाहतूक अंमलदारांनी ई-चलान मशीनद्वारे तपासणी केली असता, या दुसऱ्या ट्रकचा मूळ नोंदणी क्रमांक ‘MH-49-AT-9987’ असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी संगनमत करून एकाच ट्रकचा वाहतूक परवाना असताना, दुसऱ्या ट्रकलाही त्याच क्रमांकाची बनावट नंबर प्लेट लावून गौण खनिज अर्थात रेतीची चोरी व अवैध वाहतूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी पंचांसमक्ष ३० लाख रुपये किमतीचा १६ चाकी ट्रक (मूळ क्र. MH-17-CV-9977), २५ लाख रुपये किमतीचा दुसरा १६ चाकी ट्रक (मूळ क्र. MH-49-AT-9987, बनावट प्लेट MH-17-CV-9977) आणि दोन्ही ट्रकमधील प्रत्येकी १० ब्रास प्रमाणे एकूण २० ब्रास रेती (प्रती ब्रास ५ हजार रुपये दराने १ लाख रुपये किंमत) असा एकूण ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी आरोपी क्रमांक ०१ ते ०७ यांच्याविरुद्ध तळोधी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८, ३१९, ३३६, ३४०, ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रसिद्धीपत्रकात देणे तळोधी पोलिसांनी टाळले, सदर रेती वाहतूक कुणाच्या सांगण्यावरून होत होती? कुठे रेती जात होती? याबाबत सध्या तरी अस्पष्टता कायम आहे. पोलिसांनी आरोपींचे नाव टाळल्याने सध्या तरी सस्पेंस कायम आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि राहुल गुहे, पोलीस हवालदार हंसराज सिडाम, स्वप्नील चांदेकर, सचिन साखरकर, विजय वाकडे, पोलीस अंमलदार संदेश देवगडे, अक्षय हटवार तसेच चालक पोलीस हवालदार शामलाल कोडापे व चंद्रशेखर आसुटकर यांनी पार पाडली. बनावट क्रमांकांच्या माध्यमातून कायद्याची दिशाभूल करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर तळोधी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment