चंद्रपूर – वच्छलाबाईंना नवीन ठेला मिळाल्याने भिवापूर येथील ५२ वर्षांपासून भजे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वच्छलाबाई भोकरे यांना नवा आधार मिळाला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी ‘अम्मा की दुकान’ उपक्रमांतर्गत स्टीलचा ठेला भेट दिला. आमदारांच्या कन्या कामिनी श्रीराव सूर्यवंशी (जोरगेवार) यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
वच्छलाबाईंना नवीन ठेला; ५२ वर्षांच्या संघर्षाला आधार
आयुष्याची ५२ वर्षे प्रामाणिक कष्टात घालवून आपल्या हातच्या भज्यांच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या वच्छलाबाई किशोरराव भोकरे यांच्या संघर्षाला आता माणुसकीचा आधार मिळाला आहे. वयाच्या या टप्प्यावरही परिस्थितीसमोर हार न मानता कष्टाची कास धरून उभ्या असलेल्या वच्छलाबाईंना आमदार किशोर जोरगेवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या व्यवसायाला नवी उभारी मिळावी, यासाठी अम्मा की दुकान या उपक्रमा अंतर्गत त्यांनी नवीन स्टीलचा ठेला बनवून देण्यात आला. विशेष म्हणजे, आमदार किशोर जोरगेवार यांच्या कन्या कामिनी श्रीराव सूर्यवंशी (जोरगेवार) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. (चंद्रपुरात मराठी भाषा भवन उभारणार, वाचा बातमी)
भिवापूर येथील आर. के. चौकात गेल्या ५२ वर्षांपासून वच्छलाबाई भजे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. अत्यंत मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी वर्षानुवर्षे हा व्यवसाय सुरू ठेवत आपल्या कुटुंबाचा संसार सांभाळला. काळ बदलला, परिस्थिती बदललीय मात्र आपल्या कष्टाच्या बळावर जगण्याची त्यांची जिद्द कायम राहिली. वयाच्या या टप्प्यावरही त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मेहनत घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या परिस्थितीचा आणि संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मदतीची गरज समाजासमोर आली.
हा व्हिडिओ आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः आर. के. चौकात जाऊन वच्छलाबाईंची भेट घेतली. त्यांच्या संघर्षाची माहिती जाणून घेत त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाला अनुसरून आता त्यांच्यासाठी नवीन स्टीलचा ठेला तयार करून देण्यात आला. यावेळी वच्छलाबाईंच्याच हस्ते या नवीन ठेल्याचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या व्यवसायासाठी नवा ठेला मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर उमटलेला आनंद आणि समाधान उपस्थितांसाठीही भावनिक क्षण ठरला.
एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे म्हणजे केवळ आर्थिक आधार देणे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला आणि कष्टाला सन्मान देणे होय. वच्छलाबाईंच्या बाबतीतही हाच विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आला. त्यांच्या हातातील काम हिरावून न घेता, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता यावा आणि स्वावलंबीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवता यावा, या उद्देशाने हा ठेला देण्यात आला आहे. त्यामुळे ही मदत केवळ एका नवीन ठेल्यापुरती मर्यादित नसून ५२ वर्षांच्या कष्टाचा सन्मान करणारी ठरली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सामाजिक कार्यामागे त्यांच्या अम्माने दिलेले माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे आहेत. गरजूंच्या मदतीला धावून जाणे, कष्टकरी माणसांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजातील वंचित घटकांना आधार देणे, ही शिकवण त्यांनी आपल्या आईकडून घेतली आहे. याच विचारातून अम्मा का टिफिन सारख्या उपक्रमांसोबत अम्मा की दुकान या उपक्रमाच्या माध्यमातूनही गरजू आणि कष्टकरी व्यक्तींना मदतीचा हात दिला जात आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कौटुंबिक सोहळ्यापुरता मर्यादित न ठेवता एका कष्टकरी महिलेला नव्याने उभे राहण्यासाठी आधार देण्यात आला, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली. यावेळी प्रसाद जोरगेवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वच्छलाबाईंच्या चेहर्यावरील आनंद, नव्या ठेल्याची सुरुवात आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारी नव्या आशेची चमक, हेच या उपक्रमाचे खरे समाधान आहे. ५२ वर्षे ज्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर संसाराचा गाडा ओढला, त्यांच्या हाताला आता नव्या ठेल्याच्या रूपाने आधार मिळाला आहे. त्यांच्या हातच्या प्रसिद्ध भज्यांचा सुगंध असाच दरवळत राहावा, त्यांच्या व्यवसायाला भरभराट मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, हीच यावेळी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
माणुसकीचा हात जेव्हा कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा मदतीचा एक छोटासा प्रयत्नही एखाद्याच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण घेऊन येतो, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






