चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बहुजन समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. चंद्रपुरात बहुजन विचार मंचाने कोजागिरी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. त्यात त्या बोलत होत्या. “जर उद्या मत वाचले तरच देश आणि संविधान वाचेल,” असे त्यांनी म्हटले. आरक्षणाबाबत राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. आमदार सुधाकर अडबाले, दिलीप चौधरी आणि सूर्यकांत खनके यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. (नजूलधारकांच्या पट्ट्यासाठी आमदार जोरगेवारांचा पाठपुरावा, वाचा बातमी)
प्रतिभा धानोरकर बहुजन समाजाला आवाहन: “मत वाचले तरच संविधान वाचेल”
सध्या देशात आणि राज्यात अत्यंत चिंताजनक व अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असून, लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत आणि बहुजनांच्या हक्कांवर डल्ला मारला जात आहे. “जर उद्या ‘मत’ वाचले तरच हा देश आणि संविधान वाचेल,” असा परखड मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बहुजन विचार मंचाच्या वतीने आयोजित विशेष कोजागिरी स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी विचारपीठावरून बोलत होते. या प्रसंगी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका
खासदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकार आज अत्यंत हुकूमशाही पद्धतीने आरक्षणावर आणि बहुजनांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम करत आहे. पूर्वी खुल्या प्रवर्गात गुणवत्तेनुसार सर्वांना समान संधी उपलब्ध होती, परंतु या सरकारच्या काळात या नियमांमध्ये मागील दाराने अन्यायकारक बदल करण्यात आले आहेत. बहुजन तरुणांच्या भविष्यावर घाला घालणाऱ्या या धोरणांविरुद्ध आपण सर्व भेद, जाती-पोटजाती बाजूला सारून एकत्र येत भक्कम वज्रमूठ बांधण्याची आणि रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शवण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जातीच्या भिंती तोडण्याचे आमदार अडबाले यांचे आवाहन
या विचारपीठावरून मार्गदर्शन करताना आमदार सुधाकर अडबाले यांनी बहुजन समाजाच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण बहुजन म्हणून एकत्र न राहता जाती-पोटजातींत विखुरल्या गेलो आहोत आणि असंघटित असल्यामुळेच आपल्यावर कसा व किती अन्याय होतोय याचे भानही आपल्याला उरलेले नाही. आपण आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी खंबीरपणे आवाज उठवण्यात अपयशी ठरत आहोत, त्यामुळे जर आपल्याला स्वाभिमानाने जगायचे असेल तर जातीच्या भिंती गाडून बहुजन म्हणून एकाच छताखाली येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
तसेच, दिलीप चौधरी यांनी भूतकाळातील संघर्षाची आठवण करून देत सांगितले की, इतिहास आपल्याला विसरता येणार नाही; पूर्वी ज्या प्रकारे शोषितांवर अन्याय-अत्याचार केले जायचे, आज केवळ त्याचे स्वरूप बदलले असले तरी शोषणाची मानसिकता तीच आहे. त्यामुळे संविधानात होणारे अनधिकृत बदल आणि देशाला धोक्यात घालणारे धोरण रोखण्यासाठी बहुजन विचार मंचासारखी विचारपीठे अत्यंत मोलाची भूमिका बजावतील असे मत त्यांनी मांडले.
पुढे बोलताना सूर्यकांत खनके म्हणाले की, बहुजन विचार मंचाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जोपर्यंत बहुजन समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत नाही, तोपर्यंत राज्यकर्ते आणि प्रशासन आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करत राहील. त्यामुळे संविधानाने दिलेले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता तीव्र संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार देवराव भांडेकर, महाराष्ट्र अनुसूचित जाती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, कुणबी समाज अध्यक्ष मालेकर, बहुजन विचार मंचाचे संयोजक सूर्यकांत खनके, डॉ. दिलीप कांबळे, गटनेते सुरेंद्र अडबाले, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, ओबीसी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत थेरे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, चंद्रपूर काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, डॉ. संजय घंटे, बालवीर सिंग गुजर, अजगर अली व या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रोफेशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा यांनी मानले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






