घुग्घुस (ता. जि. चंद्रपूर) : घुग्घुस आशा स्वयंसेविका आंदोलन: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे ३२ आशा स्वयंसेविकांनी थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी सुरू केलेल्या १३ दिवसांच्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. उर्वरित १२ महिन्यांचा प्रलंबित भत्ता तीन दिवसांत बँक खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले. आंदोलनादरम्यान महिलांनी कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस ठिय्या दिला. चार स्वयंसेविकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (वरोऱ्यात तलावात आढळला वाघाचा मृतदेह)
घुग्घुसमध्ये १३ दिवसांच्या आशा स्वयंसेविका आंदोलनाला यश, घुग्घुस आशा स्वयंसेविका आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे आपल्या हक्काच्या प्रलंबित मागणीसाठी मागील १३ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस सुरू असलेल्या आशा स्वयंसेविकांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. प्रशासक व लोकप्रतिनिधींकडून आगामी तीन दिवसांत नगर परिषदेची विशेष सभा बोलावून उर्वरित १२ महिन्यांची थकीत कोरोना प्रोत्साहन रक्कम थेट आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हा लढा यशस्वी ठरला आहे. या विजयामुळे घुग्घुसच्या ३२ आशा ताईंच्या संघर्षाला अखेर न्याय मिळाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही सुरू ठेवला संघर्ष घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविकांच्या कोरोना काळातील प्रलंबित १२ महिन्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या १३ दिवसांच्या आंदोलनादरम्यान कडाक्याच्या थंडीतही या महिलांनी आपले धरणे सुरूच ठेवले. या संघर्षात चार आशा स्वयंसेविकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याने काही महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, शारीरिक त्रास, कौटुंबिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या महिलांनी मागे न हटता आपला लढा सुरू ठेवला.
आंदोलनातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि आश्वासन आंदोलनाची तीव्रता वाढल्याने अखेर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार नगर परिषदेच्यावतीने येत्या तीन दिवसांत विशेष सभा घेऊन उर्वरित १२ महिन्यांच्या कोरोना काळातील थकीत प्रोत्साहन रकमेचा प्रश्न मार्गी लावून ती रक्कम खात्यात जमा करण्याचे आश्वासन नरोत्तम/नगराध्यक्षा व सीईओ यांच्यातर्फे देण्यात आले आहे. तसेच, आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते आणि बांधकाम सभापती यांनी मिळून ३ लाख ८४ हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला आहे.
आझाद समाज पार्टीचे नेतृत्व व सज्जड इशारा विदर्भ सचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आझाद समाज पार्टीच्या जिल्हा महासचिव सौ. रिताताई फकरु देशकर यांच्या नेतृत्त्वाखाली या न्याय मागितीसाठी सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेण्यात आली होती. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून ३२ आशा स्वयंसेविकांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचा विजय असल्याचे नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केवळ आश्वासनावर न थांबता ठरलेल्या तीन दिवसांत विशेष सभा घेऊन संपूर्ण थकीत रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. जर तीन दिवसांत पैसे खात्यात जमा झाले नाहीत, तर यापुढे तीव्र स्वरूपाचे उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा आशा स्वयंसेविकांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






