Absconding Criminal Arrested : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परिसरात मागील पाच वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या बलात्काराच्या आरोपीला अखेर सावली पोलिसांनी अटक केली आहे. साईनाथ श्यामराव वासेकर (वय ४०, रा. पिपरी देशपांडे, ता. पोंभुर्णा) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, या कारवाईमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (चारित्र्यावर संशय अन युवकाची हत्या)
सन २०१६ मध्ये सावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बलात्कार प्रकरणात साईनाथविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२), (आय) व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तो न्यायालयीन प्रक्रियेला हजर राहत होता; मात्र त्यानंतर अचानक फरार झाला. मागील पाच वर्षांत त्याने वारंवार आपले ठिकाण बदलत पोलिसांना चकवा दिला होता.
दरम्यान, आरोपी मूल तालुक्यातील आकापूर येथे बनावट नावाने भाड्याने राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तातडीने पथक तयार करून सापळा रचला.
नदीत उडी मारून पळण्याचा प्रयत्न
पोलिसांची चाहूल लागताच साईनाथने उमा नदीच्या पात्रात उडी घेतली आणि झाडाझुडपांचा आधार घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिसराची नाकेबंदी केली.
घनदाट जंगलात ‘सर्च ऑपरेशन’
आरोपी जंगलात लपल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. जवळपास दोन किलोमीटर परिसर पिंजून काढत पोलिसांनी जंगलाला पूर्णपणे घेराव घातला. अखेर शिताफीने लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले. Manhunt After 5 Years
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि एसडीपीओ सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार, पीएसआय सचिन मुसळे यांच्यासह सावली पोलिसांच्या पथकाने ही धडाकेबाज मोहीम यशस्वी केली.
या अटकेमुळे परिसरात दिलासा निर्माण झाला असून, फरार आरोपींविरुद्ध पोलिसांची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Leave a Comment