Andhare vs Dhanorkar : चंद्रपूर : चंद्रपुरात जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाने सन्मान महिलांचा सशक्तीकरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते, २२ मार्चला आयोजित कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची उपस्थिती होती, कार्यक्रम आटोपल्यावर सुषमा अंधारे यांनी चंद्रपूर लोकसभा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावत आता त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वाटेत आम्ही नाकेबंदी करू अशी प्रतिक्रिया दिली. अंधारे यांच्या टीकेवर खासदार
धानोरकर
यांनी प्रत्युत्तर दिले.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर केलेल्या टीकेला आता अत्यंत धारदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "ज्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अनेकवेळा कात टाकली आणि जे आपल्या मूळ विचारांशी कधीच एकनिष्ठ राहू शकले नाहीत, त्यांनी आम्हाला निष्ठा आणि नाकाबंदीच्या बाता मारू नयेत," अशा जळजळीत शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे.
सुषमा अंधारे यांच्या विधानाचा तीव्र निषेध करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "केवळ आणि केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि 'लाईमलाईट' मिळवण्यासाठीच अंधारे यांची ही केविलवाणी धडपड सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत कुणी कुणाची नाकाबंदी केली, तिथे भ्रष्टाचाराचे काय व्यवहार झाले आणि कुणी कोणाचे खिसे भरले, याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. दुसऱ्यांच्या घराकडे दगड फेकण्यापूर्वी आपले स्वतःचे घर काचेचे आहे, याचे भान त्यांनी ठेवावे."
चंद्रपूरच्या राजकारणात नाक खुपसणाऱ्या अंधारेंना सुनावताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यंत कठोर शब्द वापरले, त्या म्हणाल्या की, "चंद्रपुरात नेमके 'शेण' कोणी खाल्ले, हे विचारण्याची हिंमत असेल तर त्यांनी आपले नेते खासदार संजय राऊत यांना विचारावे, म्हणजे त्यांना आरसा दिसेल. वारंवार तोंडघशी पडल्यानंतर एखादे अपघाती यश मिळाले की इतके हुरळून जाऊ नये. अहंकाराची ही सूज लवकरच उतरेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस आजही सर्वात मोठा आणि वरचढ पक्ष आहे, हे विसरण्याची चूक करू नका." Shiv Sena vs Congress
शेवटी अत्यंत कडक इशारा देताना त्या म्हणाल्या की, "महाविकास आघाडीत राहायचे असेल तर आघाडीचा धर्म आणि घटक पक्षांचा सन्मान राखायला शिका. आमच्या नेतृत्वावर किंवा काँग्रेस पक्षावर विनाकारण चिखलफेक केली, तर गाठ आमच्याशी आहे. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा."
चंद्रपूर महानगर पालिकेत महापौर हा प्रतिभा धानोरकर यांचा ठरला होता मात्र शिवसेना ठाकरे पक्षाने महापौर आमच्या पक्षाचा करावा अशी अट कांग्रेस पक्षासमोर ठेवली होती, एकंदरीत कांग्रेस पक्षातील नेत्याला धानोरकर यांचा महापौर नको होता, शिवसेना पक्षाला आपला महापौर हवा होता, शेवट शिवसेना ठाकरे पक्षाने राजकीय शत्रू भाजपसोबत जाणे पसंत केले. एकंदरीत कांग्रेसचा एक गट व शिवसेना ठाकरे यांना धानोरकर यांची वाट अडवायची होती. आज शिवसेना जिल्ह्यात कमकुवत झालेली आहे. कट्टर शिवसैनिक हा आजही सतरंज्या उचलताना दिसत आहे. येणाऱ्या काळात चंद्रपूर मनपाच्या राजकारणात शिवसेना ठाकरे पक्षाची वाटचाल हि अत्यंत खडतर असणार आहे.
Leave a Comment