पोलिसांच्या धाकाने तस्कराची पळापळ! ८ लाखांच्या गाड्यांसह १० गोवंश जप्त

February 03, 2026 by Prakash Hande

Animal Rescue Operations : धाबा (गोंडपिपरी) -  पोंभूर्णा पोलीस स्टेशन हद्दीतून एका चारचाकी वाहनात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती आज धाबा उप पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. संबंधित वाहन विढ्ढलवाडा मार्गे तेलंगणा राज्याकडे जात असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ कारवाई करण्यात आली. (ब्रह्मपुरी पोलिसांच्या कारवाईत गोवंश तस्कर अडकले)

मिळालेल्या माहितीनुसार, पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संबंधित वाहनाचा पाठलाग करीत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावरून धाबा उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि धमेन्द्र मडावी यांच्या नेतृत्वाखाली पोहवा विजय मडावी, श्रावण कुत्तरमारे, अमोल कुळमेथे व चंद्रशेखर आसुडकर यांच्या पथकाने हिवरा फाटा येथे नाकेबंदी केली.

नाकेबंदी दरम्यान संशयित वाहन ताब्यात घेऊन पंचांच्या उपस्थितीत झडती घेतली असता, वाहनामध्ये कोंबून ठेवलेली १० गोवंशीय जनावरे आढळून आली. तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान वाहनचालकाने गाडी सोडून पळ काढल्याने त्याचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरु आहे.

या कारवाईत १० गोवंशीय जनावरांना कत्तलीपासून वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आमले (उपविभाग मूल) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत धाबा उप पोलीस स्टेशनचे पोहवा विजय मडावी, श्रावण कुत्तरमारे, अमोल कुळमेथे, चंद्रशेखर आसुडकर यांच्यासह पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल ठेंगणे, अरविंद चौधरी व रजत रामटेके यांनी सहभाग घेतला. सदर प्रकरणाचा पुढील तपास धाबा उप पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

+