बल्लारपूर : घरगुती कलहातून एका ३८ वर्षीय महिलेने वर्धा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. २१) उघडकीस आली असून, शीतल प्रशांत मुळे (रा. सम्राट चौक, बालाजी वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. (चंद्रपुरात एमडी पावडर जोमात)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल या सास्ती येथील रहिवासी असून त्यांनी पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर २०२२ मध्ये बल्लारपूर येथील प्रशांत मुळे यांच्याशी विवाह केला होता. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू असल्याने त्या सध्या माहेरी सास्ती येथे राहत होत्या.
शुक्रवारी (दि. २०) रात्री त्या घरातून बाहेर पडल्या, मात्र परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. संशयाच्या आधारे वर्धा नदी परिसरात शोध घेतला असता शनिवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे करीत आहेत.
Leave a Comment