Boli Jagar 2026 : नवरगाव (चंद्रपूर): मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मराठी विभाग श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव (जि. चंद्रपूर) आणि पदव्युत्तर मराठी विभाग,
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला “जागर बोलींचा” हा विशेष कार्यक्रम बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी पसायदान सभागृह, श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. (
UGC नियमांवर सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक)
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भव्य शोभायात्रा व ग्रंथदिंडीने झाली. शोभायात्रेदरम्यान मराठी भाषा संवर्धनावरील गीत व घोषणा देत, तसेच कोलामी, परधान व कुरमारी बोलींची संस्कृती व इतिहास दर्शविणाऱ्या झाक्यांमधून जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले. चौकाचौकात लेझीम नृत्य, विविध जमातींची पारंपरिक नृत्ये व सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरात लोकसंस्कृतीचे रंगतदार वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव, भारतीय शिक्षण संस्था, नवरगाव सदानंद बोरकर, होते. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष, भारतीय शिक्षण संस्था, नवरगाव जयंत बोरकर, विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. सविता गोविंदवार, भाषा संचालनालय महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालक अभयराजे कुलकर्णी, प्राचार्य डॉ. अमृत लेंझे उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांमध्ये कोलामी बोली व संस्कृती अभ्यासक पैकुजी आत्राम, परधानी बोली व संस्कृती अभ्यासक वसंत कनाके आणि कुरमारी बोली व संस्कृती अभ्यासक डॉ. गजानन कोर्तलवार कुरमारी, प्रा. ब्रम्हानंद मडावी यांचा समावेश होता.
भाषा संचालक अभयराजे कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अनेक स्थानिक बोली आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बोलींचे जतन व संवर्धन होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सविता गोविंदवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून शोभायात्रेचे विशेष कौतुक केले. बोली जगेल तरच भाषा टिकेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीचा अभिमान बाळगावा व तिचा सन्मान करावा, असे त्या म्हणाल्या. त्यांनी ज्ञानेश महाविद्यालयाच्या उपक्रमाचेही कौतुक केले.
डॉ. गजानन कोर्तलवार यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. निळकंठ नरवाडे यांनी बोलीची महती सांगितली. Boli Jagar 2026
बोलीभाषा या मराठी भाषेचे वैभव असून त्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, असा ठोस संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शासनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे नवरगाव येथे सुरू असलेला ‘बोलींचा जागर’ कार्यक्रम तत्काळ थांबवून उपस्थित सर्वांनी स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Leave a Comment