Chandrapur Breaking । धक्कादायक! वर्दी मिळण्यापूर्वीच अर्पिताने गळफास घेतला; चंद्रपुरात खळबळजनक घटना

April 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur Breaking News : चंद्रपूर - पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून २० वर्षीय तरुणी चंद्रपुरात आली मात्र स्वप्नांची पूर्तता न झाल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना १७ एप्रिलरोजी सकाळी तुकूम परिसरात उघडकीस आली. तरुणीजवळ सुसाईड नोट सापडल्याची चर्चा आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात मार्ग दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपुरात अल्पवयीन गुन्हेगारीचा भस्मासुर)

 

चंद्रपुर परिसरातील तुकूम मध्ये सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास वाघोबा चौक, नोकरकर लेआऊट मध्ये भाड्याने राहणाऱ्या २० वर्षीय अर्पिता हरिदास वाकुलकर या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. मृतक तरुणी हि मागील २ महिन्यापासून चंद्रपुरात राहत होती. 

 

मरेगाव तालुका मूल मध्ये राहणारी अर्पिता हि मागील २ महिन्यापासून नियमितपणे पोलीस भरतीची तयारी करीत होती, अर्पिता ने नागपूर जिल्हा पोलीस भरतीकरिता प्रयत्न केले मात्र तिला यश मिळाले नाही. यामुळे ती खचली असावी अशी शक्यता आहे. त्यामुळे तिने नैराश्यात आत्महत्या केली असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

आज सकाळी अर्पिता रूम च्या बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी तिला आवाज दिला, मात्र आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला, रूम च्या आतील दृश्य बघून नागरिक घाबरले, अर्पिता ने नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. ती बीए दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळला ज्यामध्ये तिने कुणालाही दोष दिला नाही व कुटुंबाने मला खूप साथ दिली. असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांतर्फे मिळाली आहे.

Leave a Comment

+