Chandrapur CMC water crisis : चंद्रपूर : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत विविध स्तरांवर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. (पुरापासून संरक्षण, चंद्रपुरात उभी राहणार संरक्षण भिंत)
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत ५३ एमएलडी क्षमतेचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र तसेच ०५ नवीन उंच पाणी टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी साठवण क्षमता वाढून नागरिकांना अधिक नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
तात्काळ उपाययोजना म्हणून महानगरपालिकेमार्फत शहरात ४४ नवीन हातपंप व ०१ नवीन ट्युबवेल कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध ३२ ठिकाणी नवीन हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असून संबंधित प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना स्थानिक पातळीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.
महानगरपालिकेमार्फत शहरातील बंद पडलेले व कमी क्षमतेने कार्यरत असलेले हातपंप दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत एकूण ३३२ हातपंपांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे अनेक भागांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिक स्तरावर पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत झाली आहे.
शहरातील पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत जुन्या ९१ तसेच नवीन १६ अशा एकूण १०७ ठिकाणी सिंटेक्स टाक्या बसविण्यात आल्या आहेत. शहरातील वाढत्या मागणीचा विचार करून आणखी सिंटेक्स टाक्या उपलब्ध करण्यासाठी नवीन ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर टाक्यांमध्ये नियमित पाणी भरण्यासाठी महानगरपालिकेचे ११ तसेच खासगी ०८ असे एकूण १९ टँकर कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय शहरातील टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी विविध भागांत पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. वाढत्या गरजेचा विचार करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ०२ नवीन ट्रॅक्टर टँकर खरेदीचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरातील नागरिकांना नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.
Leave a Comment