वडेट्टीवारांचा स्फोटक आरोप: चंद्रपूर-गडचिरोलीचे २३ नगरसेवक ५ लाखात विकले?

May 26, 2026 by Prakash Hande

नागपूर -  सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून, त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन भाजपने पळवून नेल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. या सर्व विकल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींवर व्हीप जारी करून त्यांना अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया काँग्रेस पक्ष तातडीने सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (चंद्रपूर जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर)

 

वडेट्टीवार यांनी नागपूर इथे माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या सत्तेचा गैरवापर, घोडेबाजार आणि राज्यातील शेतकरी संकटावर कडाडून टीका केली. 
ठेकेदारच भाजपचे आमदार झाल्याने पैशाची मस्ती कशी येते, हे चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजारावरून दिसते आहे.काँग्रेसच्या नगरसेवकांना ५ लाख रुपये देऊन उचलण्यात आले असून, काँग्रेस जितके देईल त्याच्या डबल देऊ असे आमिष भाजप कडून दाखवले जात आहे.याचे सर्व रेकॉर्ड्स आणि पुरावे आहेत. राज्यात भाजपची सत्ता नसती, तर एकाही नगरसेवकाची पक्षांतर करण्याची हिंमत झाली नसती,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. वेळ आल्यावर सगळे पुरावे मांडू असा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.


नागपूर विधान परिषद निवडणुक बिनविरोध करण्याच्या भाजपच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की,जर निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर केवळ एका जागेवर नाही, तर सर्वच्या सर्व जागांवर भाजपने चर्चा करावी. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून उमेदवारांची नावे आली असून, पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल,अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.


राज्यातील कांदा उत्पादक आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा काढून ३५ दिवस झाले. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने कांदा खरेदी करून व्यापाऱ्यांनी आपली गोदाामे भरली आहेत.आता मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. जेव्हा भाव वाढतील, तेव्हा त्याचा फायदा शेतकऱ्याला नाही तर व्यापाऱ्यांना होईल. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून व्यापाऱ्यांचे दलाल म्हणून काम करत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली, पण अजूनही त्याचा शासन निर्णय काढलेला नाही. कर्जमाफ होणार म्हणून शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडले नाही बँका त्यांना पीककर्ज देत नाहीत. नवीन हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे करण्याचे पाप या सरकारने केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा जीव घेणारे सरकार आहे अशी सडकून टीका वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली.

महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर आणि नीट पेपर घोटाळ्यावर बोलताना विरोधकांनी राजकारण करू नये, असा सल्ला सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे. यावर वडेट्टीवार यांनी विचारले की, पूर्वी डिझेल-पेट्रोलच्या दरासाठी रस्त्यावर उतरणारे भाजपचे नेते काय राजकीय नव्हते का? जनतेचा रोष इतका तीव्र आहे की लोक रस्त्यावर उतरू नयेत म्हणून जमावबंदीचे आदेश काढले जात आहेत. सरकारने खुशाल जमावबंदी लावावी, जनता आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. जनतेला गृहीत धरणाऱ्या या सरकारला सामान्य जनता धडा शिकवेल अस वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Comment

+