Forgery and Cheating : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बनावट कागदपत्रे व खोटी सही करून वडिलोपार्जित जमीन विक्री केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार देण्यात आली असून दोन जणांविरोधात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. (फॉरेक्स ट्रेडिंग च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक)
तक्रारदार सौ. भावना किशोर वांढरे (वय ४५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे माहेर वडगाव (चंद्रपूर) येथे असून सध्या त्या हिंगणघाट येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांचे २००१ मध्ये, आईचे २०१५ मध्ये तर भाऊ दत्ता नामदेवराव ढवळे यांचे २०२३ मध्ये निधन झाले आहे. कुटुंबातील वारसांमध्ये जमीन हक्काबाबत कोणतीही अधिकृत माहिती न देता काही व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये त्या चंद्रपूर येथे आल्यावर त्यांना कळले की त्यांच्या वहिनी रीना दत्ता ढवळे आणि प्रदीप वणिकर यांनी संगनमत करून वडिलोपार्जित जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार केली. मूळ दस्त क्रमांक २०४३/२००१ (दि. २४ मे २००१) आणि २०६०/२००१ (दि. २५ मे २००१) या कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोट्या स्टॅम्प पेपरवर बनावट सहीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांचे म्हणणे आहे की, संबंधित दस्तावेजांच्या आधारे जमीन परस्पर विक्री करण्यात आली असून त्याबाबत त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. स्टॅम्प पेपरवर त्यांची खोटी सही करण्यात आल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. Forgery and Cheating
या प्रकरणी दोन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट नोंदवला आहे. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून दस्तावेजांची पडताळणी केली जात आहे. तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Comment