चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भीषण उन्हाळ्याची दाहकता आणि नागरिकांसह मुक्या प्राण्यांची होणारी होरपळ लक्षात घेऊन, चंद्रपूर महानगरपालिका व प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारे एक महत्त्वपूर्ण निवेदन सामाजिक कार्यकर्ते सोहम किरण सुदर्शन बूटले यांनी प्रशासनाला सादर केले आहे. या निवेदनात चंद्रपूरमधील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. (चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्था व्हेंटिलेटरवर, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू)
सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आणि विशेषतः चंद्रपूर शहरात उन्हाने कहर केला असून तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यामुळे संपूर्ण शहर जणू काही भट्टीत भाजून निघत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून शहरात सध्या गॅस्ट्रो, हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघात आणि डिहायड्रेशन यांसारख्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भीषण परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक, रस्त्यावर काम करणारे मजूर आणि वाहतूक पोलीस यांना बसत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोक्याचे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या चौकांमध्ये नागरिकांना आणि वाहनधारकांना उन्हाच्या तीव्रतेपासून तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी वॉटर फॉगिंग मशीन म्हणजेच पाण्याचे तुषार सोडणारी यंत्रणा बसवण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ अधिक असते, तिथे मोठ्या क्षमतेच्या आणि दर्जेदार फॉगिंग मशिन्स लावणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जटपुरा गेट परिसरात लावण्यात आलेली फॉगिंग व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि अप्रभावी ठरली होती, याची आठवण करून देत प्रशासनाने यावेळी दर्जेदार व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज ओळखून शहरातील प्रत्येक मुख्य चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची म्हणजेच पाणपोईची व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. उन्हामुळे चक्कर येणे किंवा तब्येत बिघडण्याच्या घटना घडल्यास नागरिकांना त्वरित पाणी मिळावे यासाठी या पाणपोई उपयुक्त ठरतील, तसेच येथील पाण्याची गुणवत्ता नियमित तपासून स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जावी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. याशिवाय, ज्या चौकांमध्ये सिग्नलवर वाहनधारकांना थांबावे लागते, तिथे शक्य असेल त्या ठिकाणी ग्रीन मॅट, तात्पुरते शेड किंवा छताची व्यवस्था करावी, जेणेकरून नागरिकांना उन्हाच्या थेट तडाख्यापासून काही काळ विश्रांती घेता येईल.
माणूस आपली तहान-भूक बोलून दाखवू शकतो, परंतु रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि पक्षी मात्र निसर्गाच्या या प्रकोपात होरपळून निघत आहेत. पाण्याचे स्रोत सुकल्यामुळे अनेक मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून पाण्याअभावी काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात शहरात ठिकठिकाणी पशू-पक्ष्यांसाठी पाण्याच्या कुंड्या व स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सोहम बूटले यांनी केली आहे. शेवटी, उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा यासाठी शहरात ठिकठिकाणी जनजागृती करणारे फलक, आवश्यक सूचना आणि आपत्कालीन मदत क्रमांक प्रमुख ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित केले जावेत, जेणेकरून वेळेवर उपचार मिळून जीवितहानी टाळता येईल. चंद्रपूरकरांच्या आणि येथील पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने या विषयाकडे अत्यंत सहानुभूतीपूर्वक पाहून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, असा विश्वास सोहम बुटले यांनी व्यक्त केली आहे.
Leave a Comment