चंद्रपूरची वाहतूक व्यवस्था व्हेंटिलेटरवर? एकाच दिवशी 2 अपघात २ ठार, पोलिस कुठे?

May 06, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात ५  मे रोजी २ वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः मोडकळीस आल्याचे या त्याचे घटना जिवंत उदाहरण आहे. शहरातील जनता कॉलेज चौक ते गजानन मंदिर सिग्नल या मार्गावर ५ मे ला दुचाकी चालकाला ट्र्क ने धडक दिली, या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला,  दुचाकी वाहन क्रमांक MH३४ CB ४२८८ ने मृतक जात असताना हा अपघात घडला. या मार्गावर वाहतूक पोलीस दूरदूरवर दिसत नाही. ते फक्त चंद्रपूर शहराकडे जाणाऱ्या मार्गावर उभे असतात. (वादळी वाऱ्यात काळाचा घाला, व्यावसायिकाचा मृत्यू) 

 

सायंकाळ झाली कि या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. सध्या शहरातील वाहतूक व्यवस्था हि ट्रॅफिक सिग्नलवर अवलंबून आहे. नव्या पोलीस अधीक्षक यांच्या आगमनावर जुने वाहतूक पोलीस निरीक्षक आतातरी वाहतूक कोंडीवर काही उपाय करणार का? हा न सुटणारा प्रश्न आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा, अन्यथा यावर आंदोलन करणार असा इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

दुसऱ्या रामनगर पोलीस स्टेशनसमोरील सावरकर चौक परिसरात मंगळवारी (५ मे २०२६) रात्री ११ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, लग्नकार्याच्या आनंदावर विरजण पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

प्रदीप सिडाम (वय ३२, रा. जलनगर, सपना टॉकीजच्या मागे, चंद्रपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रदीप हा तुकूम येथील आपल्या नातेवाइकांकडे आयोजित हळदीचा कार्यक्रम आटोपून ज्युपिटर गाडीने घरी परतत होता. याच दरम्यान, रामनगर पोलीस स्टेशनसमोरील सावरकर चौकात पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्रमांक: MH 34 BZ 8854) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, प्रदीप गाडीवरून खाली कोसळला आणि ट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात प्रदीपचा भाऊ सुमित सिडाम याच्या डोळ्यांदेखत घडला, जो दुसऱ्या गाडीने त्याच्या सोबतच येत होता.

 

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) राखूडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

 

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भाजप महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेविका सौ. छबूताई वैरागडे, केतन वाजपेयी, करण वैरागडे, प्रमोद क्षीरसागर, सचिन डबले आणि संकेत पुण्यपवार यांच्यासह वॉर्डातील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबाला धीर दिला आणि पोलिसांना तपासात सहकार्य केले. फरार ट्रकचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था हि व्हेंटिलेटरवर आहे, त्याचं ऑक्सिजन म्हणजेच वाहतूक सिग्नल, हे बंद झाले कि सर्व संपणार अशी अवस्था चंद्रपूर वाहतूक नियंत्रण विभागाची झाली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे, शहरात नो पार्किंग मध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्याला हटविण्याची तसदी सुद्धा पोलीस घेत नाही, अल्पवयीन चालकांचा धुमाकूळ शहरात मोठ्या प्रमाणात आहे, अल्पवयीन चालकांवर कारवाई सह त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करू, दंडात्मक कारवाई करू, असा गाजावाजा वाहतूक पोलिसांनी केला होता मात्र तो गाजावाजा हवेत विरला, आज शहरात अल्पवयीन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण पोलीस कारवाई करीत नाही. ट्रॅव्हल चालक तर वाहतूक विभागाचे जावई असल्यासारखे वागतात, चंद्रपूर-नागपूर मार्गावर यांचा ताबा आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त ट्रॅव्हल्स दिसतात. विशेष बाब म्हणजे वाहतूक विभागाच्या कार्यालयापुढे खासगी ट्रॅव्हल्स चालक प्रवासी बसवितात, त्याठिकाणी अधिकृत स्टॅन्ड नसताना, याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. 

 नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी या अनियंत्रित वाहतूक व्यवस्थेवर काय तोडगा काढणार हा येणारा काळ सांगणार.

Leave a Comment

+