Chandrapur Mayor Election : चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या आक्रमक आणि कुशल नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच जनतेने काँग्रेसवर एवढा मोठा विश्वास दाखवत ऐतिहासिक कौल दिला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूक्ष्म नियोजन आणि जनसंपर्काला दिले जात असतानाच, आता काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे या विजयाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (खासदार धानोरकर चंद्रपूर मनपा निवडणुकीत ठरल्या किंगमेकर)
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला अपेक्षित यश मिळत नव्हते. मात्र, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणुकीची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले. त्यांच्या झंझावाती सभा, तळागाळातील रणनीती आणि लोकांशी असलेल्या थेट संवादामुळे मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी कौल दिला. जनतेने दिलेला हा निकाल केवळ पक्षाचा विजय नसून, तो खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खंबीर नेतृत्वावर जनतेने दाखवलेला अढळ विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसला मिळालेल्या या स्पष्ट बहुमतामुळे आता महापौर निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, एकीकडे विजयाचा उत्साह असताना दुसरीकडे काँग्रेसमधीलच एका बड्या नेत्याने आता चंद्रपूरच्या महापौर पदावर आपला डोळा ठेवला आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्याचा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कोणताही सक्रिय सहभाग नव्हता, तो नेता आता केवळ 'आयत्या पिठावर रेघोट्या ओढत' विजयाचे श्रेय लाटण्यासाठी पुढे सरसावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Chandrapur Mayor Election
सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी हा काँग्रेसचा बडा नेता आता थेट विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि महापौर पद आपल्या मर्जीतील व्यक्तीला मिळावे यासाठी, काँग्रेसची स्वबळावर आलेली सत्ता धोक्यात घालून विरोधकांना छुपी मदत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेसची सत्ता विरोधकांच्या दावणीला बांधण्याच्या या प्रयत्नांमुळे प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
चंद्रपूरच्या जनतेने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसला सत्ता दिली आहे. मात्र, पक्षांतर्गत श्रेयवाद आणि या बड्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे जर सत्तेला धोका निर्माण झाला, तर तो चंद्रपूरच्या जनतेने दिलेल्या कौलाचा घोर अपमान ठरेल. वैयक्तिक स्वार्थासाठी विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा हा प्रकार काँग्रेससाठी घातक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Leave a Comment