Chandrapur Police Drug Raid : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करी व विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची करडी नजर असून त्यांच्याविरुद्ध कारवाई मोहीम सुरु आहे, २ एप्रिल रोजी गुन्हे शाखेने ८ किलो ७९५ ग्राम गांजा एकूण किंमत ८९ हजार १५० रुपये जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (चंद्रपुरात युवकाची हत्या)
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार ३५ वर्षीय अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक राहणार दर्गावॉर्ड घुटकाला व मोबीन या दोघांनी रहमत नगर केजीएन लॉन जवळ भाड्याने रूम करीत त्याठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक रहमत नगर मध्ये दाखल झाले, साबिराबी रफिक शहा यांच्या घरी भाड्याने दिलेल्या रूम मध्ये छापा मारला असता त्याठिकाणी पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिक मध्ये गांजा सदृश्य अंमली हिरवट रंगाची सुकलेली वनस्पती पाने, फुल, देठ व बिया असलेली गांजा वनस्पती ८ किलो ७९५ ग्राम आढळून आली. यावेळी गुन्हे शाखेने एकूण ८९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेने अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक शेख व मोबीन यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे व गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
Leave a Comment