Tiger Attack : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १३ मार्चला मध्यरात्री पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात मेंढपाळावर वाघाने हल्ला करीत ठार केले, यावेळी कुटुंबाने आरडाओरडा केला मात्र मेंढपाळाचा जीव वाचू शकला नाही. जानेवारी ते मार्च या कालावधीमधील हि ८ वी घटना आहे. ज्यामध्ये ७ वाघाच्या तर एकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. (जळाऊ लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला, वाघाने केले ठार)
मूल तालुक्यातील वनपरिक्षेत्र पोंभुर्णा मधील फिस्कुटी गावात जुनसुर्ला मधील मेंढपाळ ३६ वर्षीय वासुदेव गणपत कंकलवार हे नेहमीप्रमाणे जनावरे चराईसाठी नेत होते. १२ मार्चला जनावरे चराईसाठी नेल्यावर रात्रीच्या सुमारास रामदास जेंगठे यांच्या शेतात महाकाली मंदिरजवळ मेंढ्याची लाग बसवून झोपले होते. यावेळी भाऊ मारोती कंकलवार व त्यांची पत्नी वनिता कंकलवार देखील उपस्थित होत्या.
मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अचानक जनावरांचा आवाज आल्याने वासुदेव जागी झाले, ते बघण्यासाठी जनावरांकडे गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने वासुदेव यांच्यावर झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढविला. भाऊ जागा झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला, वाघ जंगलाच्या दिशेने पळाला मात्र तोवर वासुदेव चा मृत्यू झाला होता.
याबाबत पोलीस व वनविभागाला माहिती देण्यात आली, पंचनामा करीत मृतदेह मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला, वनविभागाने तातडीची मदत म्हणून मृतकाच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत दिली.
Leave a Comment