चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील नागपूर रोडवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असून, यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सततच्या जीवघेण्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या आम आदमी पक्षाने आज, ६ मे रोजी सायंकाळी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना एक जाहीर निवेदन सादर केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली वरोरा नाका, नागपूर रोड परिसरातील स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. (चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्था व्हेंटिलेटरवर)
गेल्या अवघ्या महिनाभराचा विचार केला, तर वरोरा नाका ते लखमापूर या दरम्यान पाच ते सात जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यातच काल याच मार्गावर अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन स्वतंत्र अपघात झाले. या भीषण अपघातांमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील पहिला अपघात रामनगर पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडला, तर दुसरा अपघात जनता कॉलेज चौक परिसरातील डॉमिनोज समोर झाला. या वाढत्या अपघातांना रस्त्यांवर होणारे बेसुमार अवैध पार्किंग, वाहतूक पोलिसांची केवळ सोयीस्कर ठिकाणी असणारी एकतर्फी तैनाती आणि प्रशासकीय अनास्था पूर्णपणे कारणीभूत असल्याचा थेट आरोप आम आदमी पक्षाने आपल्या निवेदनात केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात वाहतूक शाखेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या गंभीर समस्येबाबत १५ दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी हे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकल्याचा खळबळजनक दावा निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हलगर्जीपणानंतर अवघ्या पंधरा दिवसांत शहराने दोन बळी पाहिले. पोलीस निरीक्षक पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून याच पदावर ठाण मांडून बसले आहेत, परंतु शहरातील वाहतूक व्यवस्थेत कोणतीही सकारात्मक सुधारणा झालेली नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'आप'ने पोलीस अधीक्षकांसमोर मागण्यांची मोठी यादीच ठेवली आहे. यामध्ये बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक पाटील यांची तातडीने बदली करण्यात यावी, ही मुख्य मागणी आहे. यासोबतच नागपूर रोड, बंगाली कॅम्प रोड, तुकुम रोड आणि वरोरा नाका यांसह शहरातील सर्वच मुख्य रस्ते तातडीने अवैध पार्किंगमुक्त करावेत, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. संध्याकाळच्या सुमारास नागपूर रोडवर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने तिथे विशेष वाहतूक पथक तैनात करणे, जनता कॉलेज चौकासारख्या संवेदनशील ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक पोलीस उभे करणे आणि मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही व स्पीड सेन्सर बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वाहतुकीला अडथळा ठरणारी अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि मुख्य चौकांमध्ये एसटी बसेस व खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांना थांबण्यास संपूर्ण मनाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी हे निवेदन स्वीकारले असून यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस आणि प्रत्यक्ष कारवाई न केल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव सुनील मुसळे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा पदाधिकारी विशाल बीरामवार, इम्रान शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment