Chandrapur Shiv Sena । चंद्रपुरात शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार! महिला शहरप्रमुखांनी कार्यकर्त्यांसह हाती धरला 'कमळ'

March 22, 2026 by Prakash Hande

Chandrapur Shiv Sena Defection : चंद्रपूर - मनपा निवडणुकीत ठाकरे सेनेला भरघोस यश मिळाले मात्र राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले, अश्यातच शिवसेना महिला शहर प्रमुखाने साथ सोडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरात शिवसेना (शिंदे गट)ची ताकद कमकुवत असताना, आता महिला शहरप्रमुख सौ. वाणी शैलेश सदालावार यांनी आपल्या ११ कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः महिला आघाडीतील महत्त्वाची नेते साथ सोडल्याने संघटनेला याचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (जंगलाला आग लागू देणार नाही, ९५ गावातील नागरिकांनी घेतली शपथ)

 

चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजपचा दुपट्टा देऊन सौ. वाणी सदालावार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामध्ये सौ. नंदिनी गड्डमवार, रत्ना बिपल सरकार, कांचन शेंडे, अश्विनी निलावार, बंडू आहेरपल्लीवार, शैलेश सदालावार, गणेश ठाकूर, सुमित बिपल सरकार, लक्ष सदालावार, प्रवीण मद्दीवार आणि सौरभ ठाकूर यांचा समावेश आहे.

 

विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच भाजपच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जनसेवा करता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, मनपा निवडणुकीत सौ. वाणी सदालावार यांना तिकीट न मिळाल्याने त्या नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. या नाराजीमुळेच त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या घडामोडीमुळे शिवसेना (शिंदे गट)समोर चंद्रपूरमध्ये संघटनात्मक आव्हाने अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

या प्रवेश सोहळ्यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, नगरसेविका सुनीताताई जयस्वाल तसेच सोमेश्वर नंदनवार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व नव्या सदस्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

+