Gadchandur Awarpur road condition : कोरपना तालुक्यातील गडचांदूर – आवारपूर – कळमना – वणी हा राज्य मार्ग अतिशय वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज अवजड वाहतुकीची मोठी रेलचेल असते. या महत्त्वाच्या रस्त्यावर दूध डेअरी परिसरात मोठे खड्डे व फुटकळ अवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्या एजन्सीकडून सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शुभम अडेटवार यांनी गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पुन्हा तेच बोगस काम सुरू असल्याने नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.
आवारपूर येथे आज दर्जाहीन काम बंद पाडण्यात आले. तर नेहरू शाळेजवळ दुरुस्ती केलेला रस्ता फक्त दोन दिवसांतच पूर्ण उखडून गिट्टी उघड्यावर दिसू लागली, यामुळे पीडब्ल्यूडी विभागाचे गंभीर दुर्लक्ष उघड झाले आहे. (हे हि वाचा : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये बोनस द्या - सुधीर मुनगंटीवार)
नियमांनुसार खड्ड्यांना चौकोनी कट करणे,डस्ट माती नीट साफसफाई करणे,योग्य गिट्टीचा थर देणे,बिटुमिनस कोट टाकणे,रोलरने कम्पॅक्शन करणे ही प्रक्रिया बंधनकारक आहे.मात्र प्रत्यक्षात मातीवरच सरळ गिट्टी टाकून दुरुस्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. गुणवत्तेचा पडताळा न करताच चाललेल्या कामामुळे रस्त्याचे आयुष्य कमी होईल व काही महिन्यांत पुन्हा खड्डे पडतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आवारपूर परिसरात नागरिकांमध्ये आज प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी सरोळी बांधकाम उपविभागाचे अधिकारी शुभम अडेटवार यांची भेट घेणार आहे.
दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने 10 डिसेंबरला आवारपूर येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. Gadchandur Awarpur road condition
“गावात मातीवरच गिट्टी टाकून रस्ता दुरुस्ती केली जात आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्याकडे तक्रार केली असता, ‘मी बाहेर गावाला आहे, दोन दिवसांनी येऊन बघते’ असे सांगण्यात येते. पण नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आहे. दर्जेदार रस्ता व्हावा म्हणून आम्ही चक्काजाम आंदोलनाला सज्ज आहोत.” बाळकृष्ण काकडे,
उपसरपंच, ग्रामपंचायत आवारपूर
“सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून आम्ही या खराब रस्त्याचा त्रास सहन करतो आहोत. दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून पीडब्ल्यूडी अधिकारी शुभम अडेटवार कंत्राटदाराचे संरक्षण करीत आहेत.” कल्पतरू कन्नाके,
सदस्य, ग्रामपंचायत आवारपूर
निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुणवत्तायुक्त दुरुस्ती, जबाबदारांवर कारवाई आणि कामाचा पारदर्शक अहवाल याची मागणी गावकऱ्यांनी केली असून 10 डिसेंबरचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
Leave a Comment