Kharif Fertilizer Plan 2026 : चंद्रपूर : खरीप हंगाम २०२६-२७ चे नियोजन प्रभावीपणे व्हावे, शेतकऱ्यांना खत, बियाणे, पतपुरवठा आणि कृषी योजनांचा वेळेत लाभ मिळावा तसेच जिल्ह्यात खताची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवन, चंद्रपूर येथे आयोजित बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आढावा बैठकीत सविस्तर चर्चा केली. “खताच्या बाबतीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. बल्लारपूर मतदारसंघातील खत व बियाण्यांचे आवंटन, मागणी, उद्दिष्ट, पुरवठा व्यवस्था तसेच कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी याचा आ. मुनगंटीवार यांनी सखोल आढावा घेतला. (मूल मालधक्क्यावरून राजकारण)
तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास जाधव, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, तहसीलदार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील खत उपलब्धता, मतदारसंघातील खत व बियाण्यांचे आवंटन, शेतकऱ्यांची मागणी आणि उद्दिष्ट याबाबत अचूक माहिती घेण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. खताची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुरवठा करावा, तसेच शेतकऱ्यांनी खतांचा वापर २० टक्क्यांनी कमी करण्यासाठी निविष्ठा व्यवस्थापन व खत बचतीबाबत व्यापक जनजागृती करावी, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
मागील वर्षी खतांच्या अनियमिततेबाबत कोरोमंडल कंपनीवर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख करत यंदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने गंभीर राहावे, असे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाच्या महाविस्तार ॲपवर शेतकऱ्यांना शेतीसंबंधित सर्व तांत्रिक माहिती उपलब्ध असून मतदारसंघातील किमान ९० टक्के शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी विशेष प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक गावातील मातीचा पोत, जमिनीतील पोषकतत्वांची कमतरता, कोणती पिके घ्यावीत, कोणती खते वापरावीत याबाबत माहिती देणारे फलक गावागावात लावावेत, तसेच कृषीशी संबंधित पूरक व्यवसायांचेही मॅपिंग करावे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा स्वतंत्र आणि प्रभावी प्लॅन तयार करण्याचे निर्देश देत या योजनेच्या अनुदानासाठी ‘टॉप अप’ स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत आ. मुनगंटीवार यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील अडचणी स्पष्टपणे मांडाव्यात, योजनेतील टॉप अप, खते व बियाण्यांचा वाढीव पुरवठा, मनुष्यबळ संख्या वाढविणे, संगणक व वाहनांची उपलब्धता, कृषी कार्यालयातील पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था, सॉफ्टवेअर, भौतिक संसाधने आदी सर्व बाबींचा आढावा घेऊन माहिती सादर करावी, जेणेकरून कृषिमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत हे मुद्दे प्रभावीपणे मांडता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना खते व बियाण्यांसाठी वेळेवर कर्जपुरवठा मिळावा यासाठी बँक अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून कृषी क्षेत्रातील पतपुरवठा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना गत आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानाचा प्रश्न तसेच कृषी मित्रांना कृषी सहाय्यकांच्या सहकार्यासाठी मानधन तत्वावर घेण्याचा विषयही कृषिमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे,आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. Farmers Relief Plan
राज्यमंत्री कृषी व सचिवांसोबत होणार मुंबईत बैठक
येत्या एक तारखेला जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न मांडले जाणार आहेत. तसेच २८ तारखेला मुंबई येथे राज्यमंत्री कृषी व सचिवांसोबत बैठक होणार असून कृषी क्षेत्रातील दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न, खत व बियाणे पुरवठा, पतपुरवठा, योजनांतील अडचणी आणि प्रशासनिक सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. कृषी केंद्रांचा स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून खतांच्या रॅकची माहिती तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.
शेतकऱ्याला ट्रॅक्टरचे वितरण
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नांदगाव पोडे येथील शेतकरी श्री. नरेश आमने यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. शेतकऱ्यांना आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देत शेती अधिक सक्षम व उत्पादनक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
आ. मुनगंटीवार यांचे बैठकीत अधिकाऱ्यांकडून कौतुक
चालू बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या शेतकरीहिताच्या कार्याचे विशेष कौतुक केले. पोंभूर्णा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय अत्यंत सुसज्ज व शेतकरीहित लक्षात घेऊन उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यालयात शेतकरी बांधवांसाठी उत्तम बसण्याची व्यवस्था, आवश्यक माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी सुविधा तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करणारी रचना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक आणि सुलभ सेवा मिळावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे कार्यालय उभे केले असून ते आज शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Leave a Comment