Police Vehicle Accident । पडोलीत हादरवणारी घटना: पोलिस वाहन मागून आलं, वृद्ध दाम्पत्य जागीच ठार

April 24, 2026 by Prakash Hande

Police Vehicle Accident Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर–नागपूर मार्गावरील पडोली परिसरातील नेक्सॉन शोरूमजवळ शुक्रवारी (ता. २४) सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. आहे. रमेशचंद्र मंडल (वय ६९) व त्यांची पत्नी उषा रमेशचंद्र मंडल (वय ६४) अशी मृतकांची नावे आहेत. विशेष म्हणजे, दुचाकीला धडक देणारे पोलिसांचे वाहन होते. (रामाला तलावातील मृत माश्यांवरून खासदारांचा संताप)

 


मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील रमेशचंद्र मंडल व त्यांची पत्नी उषा रमेशचंद्र मंडल हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच ३४ एक्स ४०४२ ने चंद्रपूरहून भद्रावतीकडे जात होते. दरम्यान, त्यांच्या मागून येणाऱ्या पोलिस विभागाच्या एमटी (मोटर परिवहन) वाहन क्रमांक एमएच १२ एक्स ई ७६३५ च्या मागील चाकाखाली ते आले. या अपघातात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.


वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. पुढील तपास पडोली पोलीस करत आहेत. दरम्यान, पडोली चौक परिसरात सध्या वाहनचालक बेफिकीरपणे वाहन चालवत असल्याचे चित्र असून, वाहनांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. याकडे वाहतूक पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

+