Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्र - राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत चढ-उतार होत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जोरदार वारे, पावसासोबत गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीसह जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. (अशोक खरात चे कारनामे, केबिनमध्ये बोलावून महिलांना काय प्यायला द्यायचा?)
जालना, सातारा, अहिल्यानगर (राहाता), नांदेड आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदा तसेच आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गारपिटीमुळे पिके अक्षरशः जमिनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न धोक्यात आले आहे.
या दरम्यान अनेक दुर्दैवी घटनाही घडल्या. काही ठिकाणी वीज पडल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील मालेवाडी येथे शेतात काम करत असताना एका शेतकऱ्यावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला पाळीव कुत्राही या दुर्घटनेत दगावला. तसेच अंबड तालुक्यात दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सातारा जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली, जिथे शेळ्या चारत असताना एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या सर्व घटनांमुळे संबंधित गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
वादळ आणि विजांच्या तडाख्यामुळे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या तार कोसळून एका शेतकऱ्याच्या तब्बल नऊ गाई मृत्यूमुखी पडल्या. नांदेडमध्ये दुभत्या गायीचा मृत्यू झाला, तर बीड जिल्ह्यात काही शेतकऱ्यांचे बैल वीज पडून दगावले. सातारा जिल्ह्यातही मेंढपाळांच्या शेळ्या आणि मेंढ्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. Lightning Strike Deaths
या अवकाळी पावसामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून बाजारपेठांमध्येही नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर असलेल्या लोकांची धावपळ उडाली.
एकूणच, या अनियमित हवामानामुळे शेती, पशुधन आणि मानवी जीविताचे मोठे नुकसान झाले असून प्रभावित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
Leave a Comment