समोर वाघ दिसला अन् काळजाचा ठोका चुकला! वाघासमोर पडला तरुण आणि पुढे..

February 09, 2026 by Prakash Hande

Nagbhid Tiger Attack : नागभीड (चंद्रपूर) - नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावालगत असलेल्या देवखरा जंगल परिसरात रविवारी दुपारी थरारक घटना घडली. जंगलात वाघ असल्याची चर्चा सुरू असल्याने त्याला पाहण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांच्या समूहावर अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात गणेश वासुदेव नेवारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागभीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार)

प्राप्त माहितीनुसार, देवखरा हे लहानसे जंगल परिसर असून शनिवारीपासूनच त्या भागात वाघ दिसत असल्याच्या चर्चा गावात होत्या. रविवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास वाघ असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गावातील काही नागरिक वाघ पाहण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गणेश नेवारे व इतर काही ग्रामस्थ वाघ पाहत असताना अचानक वाघाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. घाबरलेल्या गावकऱ्यांपैकी गणेश नेवारे खाली पडले, त्यानंतर वाघाने त्यांच्या पाठीवर आणि पायावर पंज्यांनी वार केले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. Nagbhid Tiger Attack

ग्रामस्थांनी मोठ्या आवाजात आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमी अवस्थेत गणेश नेवारे यांना तत्काळ प्राथमिक उपचार देऊन नागभीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करण्यात येत आहे. गावाच्या अगदी जवळ वाघाची उपस्थिती असल्याने गोविंदपूर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलालगतच्या शेतात काही नागरिक काम करत असताना अचानक वाघाने हल्ला केला, यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जंगल परिसरात जाणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment

+