Pathari Police Station News : चंद्रपूर : पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत हार्डवेअर दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात पाथरी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (चंद्रपुरात मोठा आर्थिक गुंतवणूक घोटाळा)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजा चक विरखल (ता. पाथरी) येथील टी-पॉईंट परिसरात सचिन आनंदा गंडाटे (वय ३३) यांच्या हार्डवेअर व कृषी केंद्र दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात आरोपीने आत प्रवेश केला. दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून काउंटरमधील सुमारे ९१ हजार रुपयांची रोकड तसेच दोन लहान हातोडे चोरी करून आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी निलेश बंडू भोयर (वय २६, रा. निमगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याने व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने खर्च केल्याचे सांगितले. उर्वरित ७४,००० रुपये रोख व दोन लहान हातोडे आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आले. जप्ती पंचनामा करून मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला पालकांच्या देखरेखीखाली देण्यात आले असून मुख्य आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर, पोउपनि गोविंद चाटे, पोलीस कर्मचारी खैलेश कोरे, अमित मस्के, मेघश्याम गायकवाड, गिरीधर आंबोरकर, बळीराम बारेकर व प्रवीण काचे यांनी केली.
Leave a Comment