Railway Recruitment Fraud : चंद्रपूर - १५ युवकांना रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवीत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये वसूल करीत फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे, पोलिसांनी या प्रकरणी ५० वर्षीय मुजिबूर लतीफ कुरेशी राहणार रहमतनगर बिनबा गेट चंद्रपूर हा सध्या फरार असल्याची माहिती आहे.
देशात बेरोजगारीने उच्चांक मांडला आहे, या बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष चंद्रपुरातील मुजिबूर कुरेशी यांनी दिले, भारतीय रेल्वेत तिकीट चेकर च्या जागा असून त्याकरिता १० ते १५ लाख रुपये लागतील, जो आधी पैसे देणार त्याला नोकरीत सामावण्यात येईल असे सांगितल्यावर बेरोजगार युवकांनी पैश्यांची जुळवाजुळव सुरु केली.
मुलाला नोकरी लागणार या आशेवर आई-वडिलांनी घर व शेत गहाण ठेवत कुरेशी ला पैसे दिले, यामध्ये चंद्रपुरातील पवन वाघमारे ८ लाख ५० हजार, कौस्तुभ आदे ८ लाख ५० हजार, इक्राम शेख ९ लाख, विपीन गणवीर १० लाख, दिनेश अंडरस्कर १० लाख, अशोक सातपुते ८ लाख, रविंद्र वांढरे ८ लाख ८० हजार, घुग्गुस मधील नागराज अंबाला ६ लाख, अहेरी सिरोंचा हरीश अकुला १० लाख, पवनी, भंडारा गोपाल मुंडले ८ लाख ३० हजार, यवतमाळ शेख सय्यद ८ लाख ५० हजार, देसाईगंज अनुप शेंडे ७ लाख ५० हजार, भंडारा हरिहर मेश्राम ७ लाख ५० हजार, गंगाधर पेंडयाला मंचेरियल १० लाख व बल्लारशा मधील इम्रान पठाण यांनी ११ लाख रुपये कुरेशी यांना वर्ष २०१४ मध्ये दिले होते.
पैसे मिळाल्यावर कुरेशी यांनी सर्व युवकांना नागपुरात बोलाविले, सर्वाना विमानाने कोलकाता मध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सुरेंद्र तेलंग राहणार नागपूर व रविंद्र संभाजी वाघमारे राहणार चंद्रपूर सिस्टर कॉलोनी हे सोबत होते. कोलकाता मध्ये पोहोचल्यावर युवकांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. काही दिवसांनी एका रूमवर नेले, त्यानंतर सर्व युवकांना विविध ठिकाणी फिरविण्याची काम केले.
टीसी साठी प्रशिक्षण घ्यायचे आहे असे सांगत वेगवेगळ्या ट्रेनिंग स्कुल मध्ये युवकांना नेले, पोलीस व्हेरीफिकेशनचे पात्र युवकांना दिले, तब्बल दीड वर्षे कोलकात्यामध्ये राहिल्यावर त्यांची नियुक्ती झाली नाही, युवकांना दिलेले नियुक्ती पत्र पूर्णतः बोगस होते. आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच त्यांनी कुरेशी, तेलन्ग व वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. Railway Job Scam
आपण आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, याच दुःख मनात ठेवत युवक गावी परतले, आमचे पैसे परत द्या अशी मागणी युवकांनी कुरेशी व तेलंग ला केली मात्र तुमचे पैसे परत मिळणार नाही, रेल्वेत नोकरी मिळाली नाहीतर घाबरू नका इतर सरकारी विभागात आपण प्रयत्न करू, पण पैसे परत मिळणार नाही. त्यानंतर युवकांनी फसवणुकीची बाब आई-वडिलांना सांगितली नाही, कुरेशी चा संपर्क होत नसल्याने युवकांनी अधिक माहिती काढली असता कुरेशी फसवणुकीच्या प्रकरणात मागील वर्षभरापासून नांदेड जिल्ह्यातील कारागृहात होता.
कुरेशी कारागृहातून बाहेर आल्यावर त्याला पैसे परत देण्याची विनवणी युवकांनी केली, मात्र तो दरवेळी पैसे देतो काही काळ थांबा असे म्हणत होता, काही दिवसांनी कुरेशी ने सर्वाना बँकेचा धनादेश दिला, मात्र तो धनादेश पैसे नसल्याने वटला नाही. जानेवारी महिन्यात वर्तमानपत्रात सरकारी नोकरी घोटाळा ६ राज्यात धाडी असे वृत्त प्रकाशित झाले त्या प्रकरणाचा कुरेशी सोबत संबंध होता. आता गप्प बसायचं नाही म्हणत युवकांनी कुरेशी विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. कुरेशी यांनी १५ बेरोजगार युवकांकडून एकूण १ कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मुजिबूर लतीफ कुरेशी, रविंद्र संभाजी वाघमारे व सुरेंद्र रामकृष्ण तेलंग यांच्यावर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला. आरोपी सोबत अजून या रॅकेट मध्ये कुणाचा सहभाग आहे का याबाबत पुढील तपास सुरु आहे.
Leave a Comment