सावधान! राजुऱ्यात 'गुरू-शिष्य' नात्याला काळिमा फासणारी घटना

February 18, 2026 by Prakash Hande

Rajura POCSO Case : राजुरा  : नाताळच्या सुट्ट्यांदरम्यान अभ्यासातील शंका विचारण्यासाठी संपर्क केलेल्या नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका शिक्षकाने लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ही धक्कादायक घटना सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून या प्रकरणात पोलिसांनी संबंधित शिक्षकासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. (चंद्रपूरच्या कुख्यात गुंडांवर एमपीडीए अंतर्गत वर्षभरासाठी केले स्थानबद्ध)

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिक्षक श्रीनिल कांबळे (२७), रोहित जुलमे (२३) आणि बन्नी सल्लाम (२४) यांचा समावेश आहे.

 

माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मधील नाताळच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थिनीने अभ्यासासंदर्भातील शंका निरसनासाठी शिक्षकाला फोन केला होता. त्या दरम्यान मुलगी काही कामानिमित्त राजुरा येथे आल्याचे समजताच आरोपी शिक्षकाने तिला तेथेच थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्याने आपल्या दोन मित्रांना बोलावून घेत विद्यार्थिनीला शहरातील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

 

प्राचार्यांकडून तातडीची कारवाई

घटनेची माहिती मिळताच संबंधित कॉन्व्हेंटच्या प्राचार्यांनी त्वरित राजुरा पोलिस ठाण्यात धाव घेत १६ फेब्रुवारी रोजी अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(फ), ६४(२)(आय), ६५(१) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक कोमल घाडगे करीत आहेत.

Leave a Comment

+