Shashwat Sheti Samruddha Shetkari tagline : चंद्रपूर, दि. 11 (News३४) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच 'शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी' या नवीन घोषवाक्याचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषि आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राची शेती ही परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे. हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे. अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. Maharashtra agriculture department new logo and slogan
कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती. या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त व्हावे यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन (Call for Proposal) समावेशित करण्यात आले. कला महाविद्यालयातील आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, कलाकार, डिझायनर्स, लेखक, अधिकारी, कर्मचारी आणि अन्य इच्छुक व्यक्तींना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यात एकूण 761 बोधचिन्ह प्रस्ताव आणि 949 घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले. Shashwat Sheti Samruddha Shetkari Marathi
श्री. भरणे पुढे म्हणाले, प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मान्यतेने समिती गठित करण्यात आली. या समितीने प्रत्येक प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करून उत्कृष्ट कल्पनांची निवड केली. अंतिम निवड समितीने शासनास प्रत्येकी तीन बोधचिन्ह आणि तीन घोषवाक्यांची शिफारस केली, ज्यांपैकी एकाची अंतिम निवड शासनाने केली. 7 नोव्हेंबर 2025 ला या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आणि आज याचं अनावरण करण्यात आलं. बोधचिन्ह स्पर्धेतील विजेते विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्स, भुसावळ) आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिद्धी भारतराव देसाई (परभणी) हे ठरले. Shashwat Sheti Samruddha Shetkari tagline
या नव्या उपक्रमामुळे कृषी विभागाची दृश्य ओळख अधिक सशक्त होणार असून, यापुढे कृषी विभागाच्या सर्व अधिकृत उपक्रमांमध्ये हे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले जाणार आहे. हे चिन्ह आणि घोषवाक्य हे कृषी विभागाची मालमत्ता असून, त्याचा अनधिकृत वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
Leave a Comment