Sudhir Mungantiwar Student Speech : चंद्रपूर : “सी फॉर चंद्रपूर म्हणजेच सी फॉर चॅम्पियन” हा प्रेरणादायी मंत्र देत, राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर जीवनात यश मिळविण्याचे मार्गदर्शन केले. सन्मित्र सैनिक विद्यालयाच्या पासिंग आऊट परेड कार्यक्रमात बोलताना त्यांनी चंद्रपूरच्या सेवाभाव, पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाच्या परंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आ.मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या. (चंद्रपूरकरांचे नशीब पालटणार, मुनगंटीवारांनी दिली न्यूज)
सन्मित्र सैनिक विद्यालयाच्या वतीने आयोजित पासिंग आऊट परेड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. निलेशजी चोरे, सहसचिव नितीनजी कुमरवार, सदस्य बिपीन देशपांडे, प्राचार्य अरुंधती कावडकर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,चंद्रपूर ही केवळ भौगोलिक ओळख नसून सेवाभाव, पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाच्या तेजाने पावन झालेली प्रेरणादायी भूमी आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनाच्या माध्यमातून सेवाभावाने प्रेरित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित-वंचितांना चंद्रपूर येथे धम्मदीक्षा देऊन पावन केलेली, जगातील सर्वाधिक वाघांची ओळख असलेली आणि देशासाठी सर्वाधिक सोनं दान करणाऱ्या पराक्रमाची साक्ष देणारी ही चंद्रपूरची पवित्र भूमी आहे. सेवा, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या भूमीत शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने भाग्याची बाब आहे. अशा प्रेरणादायी वातावरणात घडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सेवाभाव, पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव आपोआप रुजते आणि तेच त्यांना आयुष्यात पुढे नेणारे बळ ठरते, असा विश्वास यावेळी आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Passing Out Parade
“सी फॉर चंद्रपूर म्हणजेच ‘सी फॉर चॅम्पियन’ व्हा,” असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, शिस्त आणि समर्पण अंगीकारण्याचे सांगितले.यावेळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आला. भगवा म्हणजे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित जीवनाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या आदर्शांचा उल्लेख करत, सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ.मुनगंटीवार यांनी योगी अरविंद यांच्या विचारांचा उल्लेख केला. “कोणतेही काम ईश्वराची अर्चना समजून करा,” असे सांगत त्यांनी मेहनत, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करता येते, असा विश्वास व्यक्त केला. सन्मित्र सैनिक विद्यालय हे केवळ शिक्षण देणारे नसून राष्ट्रभक्ती आणि संस्कार घडवणारे केंद्र असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
Leave a Comment