tadoba chital relocation project : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) - ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी आज यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळ सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून एनएनटीआरमधील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले.
हे सुद्धा वाचा - ५ वर्षे पोलिसांना चकवणारा चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू न होणे. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राण्याचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.
जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
ही मोहीम पुढील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली: श्री सचिन शिंदे, विभागीय वनअधिकारी, टीएटीआर; श्री अतुल देवकर, विभागीय वनअधिकारी, एनएनटीआर; श्री बापू येळे, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, चंद्रपूर; श्री विवेक नातू, सहाय्यक वनसंरक्षक, टीएटीआर; श्री विशाल वैद्य, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोलारा, टीएटीआर; तसेच कोलारा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी.
ताडोबा आणि नवेगाव–नागझिरा या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांदरम्यानच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही स्थानांतर प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेला डॉ. प्रभू नाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, टीएटीआर आणि श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोअर), टीएटीआर यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Comment