tiger killed by train in Rajura : चंद्रपूर ३० नोव्हेम्बर (News३४) : बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास राजुरा वन विभागाच्या चनाखा बीट मध्ये घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांसाठी रेल्वे मार्ग जीवघेणा ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा वन विभागाच्या चनाखा बीटमधील विहिरगाव राऊंड, कक्ष क्रमांक १६० येथे रेल्वे रुळावरून मालगाडी जात असताना ही वाघीण रूळ ओलांडत होती. त्याचवेळी तिला रेल्वेने जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी होऊन रुळाच्या उजव्या बाजूला पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राजुरा येथील उपविभागीय वन अधिकारी एम. डी. गिरडकर आणि राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. tiger killed by train in Rajura
वन अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात वाघिणीचे दात आणि सर्व अवयव शाबूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत पुढील कार्यवाही राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे करत आहेत. या घटनेमुळे वन्यजीव आणि रेल्वे मार्गालगतच्या भागातील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Leave a Comment