चंद्रपूर – Online Job Fraud Chandrapur प्रकरणात चंद्रपूर शहरात ऑनलाइन काम करून दामदुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिला कर्मचाऱ्याची ६४ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाली. व्हॉट्सॲप संदेशानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडून विविध टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला थोडी रक्कम परत देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या व्यवहारांतून मोठी रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. (हे हि वाचा – ६ लाखांची चोरी, स्थानिक गुन्हे शाखा पोहोचली छत्तीसगड)
ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली उकळली मोठी रक्कम
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजनी गोपाल सोदारी या दुर्गापूर येथील WCL कॉलनीतील शक्तीनगर भागात आपल्या कुटुंबासह राहत असून त्या चिंचाळा एमआयडीसीतील अगस्ता मोटर्स येथे नोव्हेंबर २०२३ पासून कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. ६ मार्च २०२५ रोजी त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला ज्यामध्ये ऑनलाइन बिझनेससाठी मार्केटिंग करत असल्याचे सांगत हॉटेल्सना रिव्ह्यू दिल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
फिर्यादीने सहमती दर्शवल्यानंतर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपवर जोडण्यात आले जिथे प्रियंका आणि गौरव नावाच्या व्यक्तींनी त्यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना काही रक्कम परत देण्यात आली, मात्र त्यानंतर वेगवेगळ्या टास्कच्या नावाखाली गुगल पे स्कॅनरद्वारे एकूण ७६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले गेले. त्यापैकी १२ हजार ४०० रुपये परत मिळाल्याचे भासवून आरोपींनी संगनमत करून एकूण ६४ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर माध्यमातून वारंवार फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने २९ जुलै २०२६ रोजी पडोली पोलीस ठाण्यात गाठून तोंडी फिर्याद नोंदवली, आणि या प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






