चंद्रपूर – Lcb burglary action in Chandrapur चंद्रपूर शहरात गाजलेल्या एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, बसस्थानक परिसरातील एका कार्यालयातून तब्बल सहा लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या मुख्य आरोपीला छत्तीसगड राज्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून तीन लाखांची चोरीची रोकड देखील हस्तगत केली आहे. (हे हि वाचा – वायरमनला मारहाण, खांबाला बांधण्याची धमकी)
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील डी.एस.के. ग्रीन कॉलनी, दाताळा येथील निवासी फिर्यादी सौ. राकेश अवघडे (वय ४४ वर्षे) यांच्या बस स्टँडजवळील पॅलेस हॉटेलमागील कार्यालयातून अज्ञात चोरट्याने ६ लाख रुपयांची रोकड लांबविली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले होते.
या विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील रेंगाकठेरा येथील संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय ३८ वर्षे) याचा माग काढला आणि त्याला छत्तीसगडमधून शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीदरम्यान आरोपीने २७ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ६ लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या झडतीत त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
उर्वरित रकमेचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून, आरोपीला पुढील कायदेशीर व सखोल तपासासाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, इम्रान खान, लालू यादव, संदीप, हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे आणि शशांक बदाम यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






