राजोली विकासकामांच्या घोषणांदरम्यान नूतन वाचनालयाचे लोकार्पण करताना आमदार सुधीर मुनगंटीवार.

राजोलीच्या विकासासाठी मुनगंटीवारांच्या अनेक घोषणा; वाचनालयाचे लोकार्पण

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 29, 2026

चंद्रपूर – राजोली विकासकामे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध घोषणा केल्या आहेत. जिल्हा खनिज विकास निधीतून उभारलेल्या नूतन वाचनालयाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. वाचनालयाला स्वर्गीय आनंदराव शेंडे यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली. यासोबतच सिंचन, आरोग्य सुविधा, स्मशानभूमी, आठवडी बाजार आणि रस्त्यांच्या कामांबाबतही त्यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. (२५१ कुंडीय यज्ञाचे भूमिपूजन, वाचा बातमी)

राजोली विकासकामे मुनगंटीवारांच्या महत्त्वपूर्ण घोषणा

गावाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित नसून तो शिक्षण, आरोग्य, शेती आणि सामाजिक जाणीवांशी जोडलेला असला पाहिजे, या भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजोलीच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. जिल्हा खनिज विकास निधीतून १ कोटी ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या राजोली येथील नूतन वाचनालय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले.

विशेष म्हणजे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या वाचनालयाचे लोकार्पण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत आ.मुनगंटीवार यांनी या वाचनालयाला स्वर्गीय आनंदराव शेंडे यांचे नाव देण्याची घोषणा केली. तसेच त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, राजोलीतील तरुण-तरुणींनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे आणि गावाने ज्ञानाच्या बळावर प्रगतीची नवी वाट धरावी, हा या वाचनालयामागील मुख्य उद्देश असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, मूल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, माजी सरपंच आनंद पाटील ठिकरे, माजी सभापती चंद्रकांत गांगरेड्डीवार, माजी उपसभापती गजानन वलकेवार, सरपंच प्रियंकाताई निर्मलवार, माजी सरपंच बंडू निर्मलवार, सुरेश पाटील ठिकरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीनदयाल मटाले, उपविभागीय अभियंता कुणाल येनगंदेलवार, गजानन घुगल, शाखा अभियंता योगेश महेंद्रकर, प्रमोद कोमलवार, नगरसेविका प्राची आक्केवार, अश्विनी निकोडे, ओबीसी जिल्हा महामंत्री शिवानी आगडे, सोनियाताई गुरनुले आदी उपस्थित होते.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार महासागरासारखे विशाल आहेत. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली…’, या त्यांच्या विचारांमध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाच्या प्रगतीचे संपूर्ण सूत्र सामावलेले आहे. केवळ जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करून चालणार नाही, तर महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आवश्यक आहे. याच भावनेतून राजोली येथे वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. गावातील शिक्षक, माजी अधिकारी आणि विद्यार्थ्यांची बैठक घेऊन आवश्यक पुस्तकांची यादी तयार करावी. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. राजोलीतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत, अशी अपेक्षाही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

यावेळी आ.मुनगंटीवार यांनी राजोलीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सत्ता असो अथवा नसो, विचारांशी निष्ठा राखून समाजकार्य करण्याची परंपरा राजोलीने जपली आहे. या विचारांची मशाल प्रज्वलित ठेवण्यात स्वर्गीय आनंदराव शेंडे यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी त्यांचा गौरव केला. आनंदराव शेंडे हे विचारांचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे त्यांच्या नावाने वाचनालय ओळखले जावे, असे ते म्हणाले.

शेतकरी आणि सिंचनाच्या प्रश्नांना प्राधान्य

राजोली परिसरातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चा केल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनादरम्यान जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देताना ते म्हणाले की, मतदारसंघातील माजी मालगुजारी तलावांच्या खोलीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मंत्री संजय राठोड यांनी निधी उपलब्ध झाल्यानंतर बल्लारपूर मतदारसंघातील तलावांच्या खोलीकरणासाठी प्राधान्याने निधी देण्याचे मान्य केले आहे.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; प्रत्येक पीएचसीमध्ये वातानुकूलित शवपेटी

मतदारसंघातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा अलीकडेच आढावा घेण्यात आला. यामध्ये रुग्णवाहिकांच्या टायरची अवस्था लक्षात घेऊन ४ डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णवाहिकांना नवीन टायर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित शवपेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मूल, बल्लारपूर आणि पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयांना अत्याधुनिक शववाहिका देण्यात येणार आहेत.राजोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी झुडपी जंगलातील जागा उपलब्ध करून दिली आहे.

४ डिसेंबरला आरोग्यमंत्र्याचा दौरा

येत्या ४ डिसेंबरला आरोग्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निमंत्रित केले असून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा राज्यात सर्वोत्तम करण्याचा संकल्प असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर मेडिकल कॉलेज, मूल येथील १०० खाटांचे मोठे उपजिल्हा रुग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल आणि बल्लारपूर येथील प्रस्तावित २०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक ईएसआयसी रुग्णालय या माध्यमातून आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्मशानभूमी आणि आठवडी बाजाराची कामे प्राधान्याने

राजोली येथील आठवडी बाजारासाठी आधुनिक आराखडा तयार करण्याच्या सूचना आ.मुनगंटीवार यांनी दिल्या. बाजारात पाणी साठवणूक व्यवस्था, ओटे आणि आवश्यक सुविधांचा समावेश करून अंदाजपत्रक सादर करावे, त्याला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच गावातील स्मशानभूमीच्या उभारणीसाठी जागेचा प्रश्न सोडवून जमीन उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी आवश्यक निधी देण्याची जबाबदारी आपण घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. पडोली आणि चिंतलधाबा येथील स्मशानभूमींसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये उपलब्ध करून दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला. राजोलीतील स्मशानभूमी आणि आठवडी बाजार या दोन्ही कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजोलीच्या पायाभूत सुविधांसाठीही महत्त्वाचे निर्णय

राजोली ते मूल या मार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) माध्यमातून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे परिसरातील रस्ते वाहतुकीला अधिक गती आणि सुरक्षितता मिळणार आहे.शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्यांची घोषणा आपण अर्थमंत्री असताना केली होती. आगामी काळात मतदारसंघातील पांदण रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment