तळोधी (बा.) / सावरगाव: Social Media Power चा एक अनोखा प्रत्यय विदर्भातील एका घटनेतून समोर आला आहे. घर सोडून गेलेली व्यक्ती वर्षभर न सापडल्याने नातेवाईकांनी सर्व आशा सोडून दिल्या होत्या. नातेवाईकांनी स्थानिक परंपरेनुसार महिलेचे सर्व अंत्यसंस्कार उरकले होते. त्यांनी रीतसर तेरवी करून शेतात समाधीही बांधून घेतली होती.
मात्र एका व्हायरल व्हिडिओमुळे बेपत्ता महिला जिवंत असल्याचे कुटुंबाला समजले. सामाजिक संस्थेच्या तत्परतेमुळे ही महिला तब्बल वर्षानंतर सुखरूप घरी पोहोचली. (हे हि वाचा – चंद्रपुरात पोलिसांचा भव्य रूट मार्च)
Social Media Power : एका व्हायरल व्हिडिओने उघड केले जिवंत असण्याचे सत्य
घर सोडून गेलेली व्यक्ती वर्षभर शोधूनही न सापडल्याने कुटुंबीयांनी सर्व आशा सोडून दिल्या; अंत्यसंस्काराचे विधी उरकले, तेरवी केली आणि समाधीही बांधली. मात्र नियतीचा चमत्कार असा की, ज्या माऊलीला मृत मानले होते, तीच आई तब्बल एका वर्षानंतर सुखरूप घरी परतली. सोशल मीडिया आणि सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या एका आदिवासी महिलेची कुटुंबीयांशी झालेली ही हृदयस्पर्शी पुनर्भेट सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरातील मोहरली येथील ६० वर्षीय दस्सो मुक्का कांदो या महिला मानसिक स्थिती ठीक नसल्याने वर्षभरापूर्वी अचानक घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा छत्तीसगडसह विविध भागात कसून शोध घेतला; मात्र कुठेही थांगपत्ता लागला नाही. दिवसेंदिवस शोधाची आशा मावळल्याने अखेर कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे गृहीत धरले. काही महिन्यांपूर्वी स्थानिक परंपरेनुसार कपडे खड्ड्यात ठेवत त्यांची समाधी बांधली, तेरवीचा कार्यक्रम करून संपूर्ण गावाला जेवणही दिले.
दरम्यान, मुक्का कांदो या नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर परिसरात रस्त्याच्या कडेला भटकंती करताना एका स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी माणुसकी दाखवत तातडीने नांदेड (ता. नागभीड) येथील ‘डोमाजी आधार फाऊंडेशन’ संचलित छत्रपती शिवाजी महाराज आश्रमाशी संपर्क साधला. माहिती मिळताच आश्रमाचे सदस्य परमेश्वर मळावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या निराधार महिलेला आश्रमात दाखल केले.
आश्रमात त्यांच्यावर नागपूर येथील मनोरुग्ण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. योग्य देखभाल आणि औषधोपचारामुळे त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. यानंतर आश्रमाकडून त्यांच्या रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. हा व्हिडिओ दस्सो यांच्या भाच्यासह गावातील लोकांच्या पाहण्यात आला आणि वर्षभरापासून बेपत्ता असलेली आई जिवंत असल्याचे कुटुंबीयांना समजले.
खात्री पटल्यानंतर डोमाजी आधार फाऊंडेशनचे परमेश्वर मळावी, रजनी कुंभारे, मनीष खोब्रागडे, आशिष खोब्रागडे, आदित्य उईके आणि समृद्ध खोब्रागडे यांनी वाहनाने तब्बल पाच तासांचा प्रवास करून मुक्का कांदो यांना त्यांच्या मूळ गावी मोहरली येथे सुखरूप पोहोचवले. दारात आईला जिवंत उभे पाहून पती, मुलगा आणि मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला. ज्या आईची समाधी बांधली होती, तीच आई पुन्हा समोर आल्याने संपूर्ण गाव हरखून गेले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






