Sun Vijay Alloys Chandrapur

Sun Vijay Alloys Chandrapur कंपनीत खासदारांचा दणका

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 18, 2026

चंद्रपूर : Sun Vijay Alloys Chandrapur कंपनीतील कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ताडाळी येथील या प्लांटमध्ये शांततापूर्ण आंदोलन केल्यामुळे निलंबित केलेले कामगार प्रतिनिधी सुनील पारखी यांना तात्काळ सन्मानाने पुन्हा सेवेत घेण्याचे स्पष्ट निर्देश खासदारांनी दिले आहेत. कंपनी व्यवस्थापनाचा सूडबुद्धीचा निर्णय मोडून काढत कामगारांना मोठा न्याय मिळवून दिला आहे. (७०० कामगारांवर उपासमारीची वेळ, आमदार जोरगेवार आक्रमक)

Sun Vijay Alloys Chandrapur कंपनीतील वादावर खासदारांची तोडगा बैठक

ताडाळी येथील ‘सन विजय अलॉयज अँड पॉवर लिमिटेड’ कंपनीतील कामगारांच्या न्याय्य मागण्या आणि कंपनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केल्यामुळे कामगारांचे प्रमुख प्रतिनिधी सुनील पारखी यांना १६ जून २०२६ रोजी निलंबित करण्यात आले होते. व्यवस्थापनाचा हा सूडबुद्धीचा निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना सन्मानाने पुन्हा सेवेत सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या बैठकीत कंपनी प्रशासनाला दिले. तसेच, कंपनी प्रशासनातील अनेक गंभीर त्रुटी या बैठकीदरम्यान समोर आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आणि कामगारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. 

या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार पवार, पोलीस निरीक्षक कोकोडे, नायब तहसीलदार धांडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, तालुका अध्यक्ष अनिल नरुले, नगरसेवक राहुल चौधरी, दीपक मित्रा, देवानंद लांडगे, अनिल सुरपाम आणि भूषण पिदूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत कामगारांच्या विविध आर्थिक, कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले. आंदोलन कालावधीत कामगारांचा कापण्यात आलेला हक्काचा पगार त्वरित देण्यात यावा आणि त्यांच्यावर सुरू असलेला मानसिक त्रास व अन्याय तात्काळ थांबवावा, अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली. सर्व कामगारांना हक्काची वार्षिक वेतनवाढ लागू करणे, महागाई भत्ता, व्हीडीए आणि इतर सर्व आवश्यक भत्ते नियमितपणे देणे, तसेच नियमानुसार भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआयसी  चे लाभ मंजूर करणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच, साप्ताहिक सुट्टीचे देयक नियमानुसार अदा करावे, अतिरिक्त काम करून घेतल्यास ओव्हरटाईमचे पेमेंट नियमानुसारच दिले जावे, तसेच नवीन कामगार कायद्यानुसार मिळणारे सर्व कायदेशीर लाभ प्रत्येक कामगाराला मिळालेच पाहिजेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

कामगारांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने, कंपनीत काम करत असताना झालेल्या अपघातातील बाधित कामगाराला योग्य नुकसानभरपाई आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची सक्त ताकीद व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. भविष्यात अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवून कंत्राटदारांमार्फत कामगारांना महिन्यातून दोनदा सुरक्षा साहित्य आणि वर्षातून दोनदा सुरक्षा बूट सक्तीने पुरवण्यात यावेत. तसेच आर्थिक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी सर्व कामगारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे आणि पगारासोबत स्वाक्षरी असलेली अधिकृत पे-स्लिप कामगारांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या कणखर आणि संवेदनशील भूमिकेमुळे ‘सन विजय अलॉयज’च्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरातून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment