त्या विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्येची सिनेट सदस्यांनी घेतली दखल

News34

चंद्रपूर – राजुरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली (खुर्द) हे महाविद्यालय मागील काही वर्षापासून नियमित कार्यरत आहे. या महाविद्यालयात सर्व क्षेत्रातील शिक्षण मिळणारी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळाला आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.

 

या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी २० किमी अंतरावर असल्यामुळे खराब रस्त्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर जाण्यासाठी अडचणी येत असल्याने दरवर्षी अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहे. यावर्षी तर राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गावरील नाल्यावरचा मोठा पुलिया पाण्यात वाहून गेल्याने हा मार्गच बंद आहे.

 

अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊ शकत नाही यामुळे ग्रामीण भागात महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली (खुर्द) येथे देण्याची मागणी सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ कावळे सर, परीक्षा नियंत्रण अधिकारी झाडे सर यांच्याशी चर्चा करून कुलगुरू यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सदर विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली त्यानंतर परिक्षा केंद्र देण्यासंदर्भात परिक्षा विभागातील सर्व निकषांवर चर्चा करून सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन यावेळी विद्यापीठामार्फत देण्यात आले.

आई तुळजा भवानी महिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था ज्योतीनगर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली (खुर्द) येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी गावाजवळचे महाविद्यालय म्हणून पसंती दर्शवित आहे. चालू सत्रात ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चिंचोली (खुर्द) हे गाव मध्यभागी असून सभोवतालच्या निमणी, पेलोरा, नांदगाव, कवठाळा, चंदनवाही, पोवणी, रामपुर, कळमणा, आर्वी, माथरा, गोवरी, साखरी अशा गावातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत आहेत.

 

तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खराब रस्त्यामुळे वेळेवर बससेवा किंवा खाजगी वाहतूक उपलब्ध नाही. परीक्षेच्या काळात विद्यार्थाना जीव मुठीत घेऊन प्रवास करून परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागत आहे. मागच्या वर्षी परीक्षेसाठी निघालेल्या दोन विद्यार्थिनींचा नाहक अपघाती मृत्यू झाला. तसेच किरकोळ अपघातात अनेक विद्याथ्यांचे नुकसान झाले आहे. तर वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचता न आल्याने अनेकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे.

चिंचोली (खुर्द)- राजुरा मार्ग पूर्णता खड्डेयुक्त असून विद्यार्थी प्रवासादरम्यान मोठ्या संकटात सापडत आहे. परिसरातील ग्राम पंचायत व पालकानीसुद्धा चिंचोली (खुर्द) येथेच परिक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोग (यु.जी.सी) च्या निकषानुसार महाविद्यालयाची पटसंख्या, त्याठिकाणी योग्य सोई सुविधा, ईमारत, बैठक व्यवस्था बरोबर आहे. याविषयी महाविद्यालयाने पत्रव्यवहार सुद्धा केला परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे शिवसेना- युवासेनेच्या वतीने निवेदन देत परीक्षा केंद्राची मागणी केली आहे.

 

सदर मागणी पूर्ण न झाल्यास विद्यार्थी, पालक व नागरीकांच्या मनातील रास्त मागणी लक्षात घेऊन आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख, सास्ती ग्रामपंचायत उपसरपंच कुणाल कुडे,युवासेना तालुका प्रमुख अमित(बंटी) मालेकर , स्वप्निल मोहुर्ले, प्रविण पेटकर, वतन मादर व इतर युवासेना पदाधिकारी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनातून दिला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!