News34 chandrapur
अखेर आशिया चषक 2023 ची सांगता झाली. 19 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 13 सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव 50 धावांवर आटोपला. भारताने 6.1 षटकात 10 विकेट्स राखून सामना जिंकला.
आशिया कप चा राजा कोण?
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारताने ही स्पर्धा वनडेमध्ये सात वेळा आणि टी-20मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेने वनडेमध्ये पाच वेळा आणि टी-20मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी कहर केला. मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या झंझावाती गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव 15.2 षटकांत 50 धावांवर आटोपला. सिराजने सहा, तर हार्दिकने तीन बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या 37 चेंडूत सामना जिंकला. टीम इंडियाने 10 गडी राखून फायनल जिंकली. शुभमन गिल 19 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला आणि इशान किशन 18 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला. शुभमनने सहा चौकार तर ईशानने तीन चौकार मारले.
या विजयासह भारताचा बहुराष्ट्रीय स्पर्धांमधील पाच वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळही संपुष्टात आला आहे. आशिया चषक 2023 पूर्वी भारताने शेवटचा आशिया कप 2018 मध्ये जिंकला होता. तेव्हाही कर्णधार रोहित शर्माच होता. आजही त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन बनली आहे. 2018 आशिया चषकापासून, भारत महत्त्वपूर्ण सामने आणि प्रसंगांवर वर्चस्व राखण्यात अपयशी ठरला होता.
भारताने 2019 एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि 2023 WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले. गेल्या वर्षीच्या आशिया चषकात श्रीलंकेने जेतेपद पटकावले होते त्यातही संघ आपली उपस्थिती जाणवू शकला नाही. 2022 मध्ये आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला.