Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूरशिक्षण बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात होणार भव्य आंदोलन

शिक्षण बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात होणार भव्य आंदोलन

सरकारच्या खासगीकरणाविरुद्ध धरणे/निदर्शने आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

 

राज्य सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती व शासकीय शाळा खासगी संस्था / कंपन्यांना देण्याचा डाव आखला आहे. देशाचं भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्रात सरकारने केलेल्या खासगीकरणाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जनआंदोलन उभारणे आवश्यक आहे. या आंदोलनाबाबत नियोजन सभा नुकतीच मातोश्री विद्यालय, तुकुम चंद्रपूर येथे पार पडली.

 

“आरक्षण अप्रत्यक्षरित्या संपविण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने आखला आहे” तो हाणून पाडण्यासाठी उभारण्यात येत असलेले जनआंदोलन एक लोक चळवळ व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी असताना सरकार दत्तक शाळा योजना राबवित आहे. यामुळे भविष्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, यामुळे आपण सुजाण नागरिक म्हणून जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.

 

सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई पोटदुखे, गजाननराव गावंडे, जगदीश जुनघरी, नंदू नागरकर, सुरेश पचारे, मनदीप रोडे, पप्पू देशमुख, प्रा. दिलीप चौधरी, बळीराज धोटे, गंगाधर वैद्य, प्रा. निलेश बेलखेडे, दीपक जेऊरकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, हरीश ससनकर, रामराव हरडे, महादेव पिंपळकर, नागेश सुखदेवे, कोटेवार, वाढई, आसुटकर, बिजवे, नामदेव मोरे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेला जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त करीत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा प्रखर विरोध केला.

 

२ ते ५ ऑक्टोंबरदरम्यान आंदोलनातील मागण्यांचे निवेदन आपआपल्या संस्था/ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना पाठवावे. त्यानंतर सर्वांनी ६ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या धरणे / निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले, डॉ. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके व विविध संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular