Thursday, April 25, 2024
Homeक्रीडापालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे घुग्घुस येथील 160 कुटुंबाचे होणार पुनर्वसन

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे घुग्घुस येथील 160 कुटुंबाचे होणार पुनर्वसन

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे सहा एकर जागा उपलब्ध

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : वेकोलिच्या खाणींमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या घुग्गुस येथील १६० कुटुंबाचे नवीन जागेवर पुनर्वसन होणार आहे. या कुटुंबीयांना निवाऱ्यासह सर्व मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन जागेवर या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार हे सुरुवातीपासूनच आग्रही होते. याबाबत त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात २६ ऑगस्ट २०२२ रोजी गजानन मडावी यांचे घर भूस्खलनामुळे ६० ते ७० फूट जमिनीत गेले. या घटनेची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. वेकोलिच्या खाणींमुळे परिसरातील इतर १६० घरांनासुध्दा भूस्खलनाचा धोका असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासूनच या सर्व कुटुंबांचे इतर जागेवर पुनर्वसन करण्यासाठी पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

 

त्यानुसार मौजा घुग्गुस येथील शासकीय जमीन स.न. २९/१, आराजी ५९.४७ हे. आर. जागेपैकी २.४० हे. आर. (६ एकर) जागा या १६० कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांचे योग्य पुनर्वसनाकरीता भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३०, ३१ व ४० आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ४२ (१) (अ) व नियम ४५ अन्वये घुग्गुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

 

दहा दिवसांच्या आत पीडितांच्या हातात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे चेक

घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेऊन घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ १० हजार रुपये देण्यात येईल, असा शब्द पीडित कुटुंबाना दिला होता. भूस्खलनाच्या दुर्घटनेप्रकरणी बाधित झालेल्या १६० कुटुंबांसाठी पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी केवळ दहा दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ लक्ष रुपये मंजूर करून आणले होते. सदर रक्कम जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आली व मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला १० हजार रुपये याप्रमाणे १६ लक्ष रुपये तातडीने वाटप करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!