News34 chandrapur
चंद्रपूर : सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व इतर पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या ५ वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर येताच आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्न उपस्थित करून सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती – जमाती व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागतो आहे.
सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येते. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून लवकरात लवकर सदर शिष्यवृत्ती मंजुर करावी तसेच मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील, यासाठी प्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर यांना विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत सामावून घेण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर चालू हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सदर गंभीर बाबीकडे लक्ष वेधले.