पंचनामा – शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेला चंद्रपुरातील आनंद मेळा

News34 chandrapur

चंद्रपूर : शहरात आनंद मेळा उघडण्यासाठी विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ती सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र या विभागांची परवानगी न घेताच चांदा क्लब ग्राउंड येथे आनंद मेळा सुरू असून यातून दररोज लाखोंची कमाई केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद मेळाच्या मालकाशी हातमिळवणी केल्याने शासनाचा महसूल तर बुडतच आहे मात्र लहान मुले आणि सामान्य लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

 

40 ते 50 लाखांची उलाढाल

चंद्रपूर शहरात वर्षातुन दोन ते तीनदा आनंद मेळा लागतो. जयंत टॉकीज जवळ, चांदा क्लब ग्राउंड आणि विद्या निकेतन शाळेजवळ हा आनंद मेळा लागतो. यामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, झुले, टॉय ट्रेन आणि अनेक साहसी खेळ असतात. इथे पार्किंगचे पैसे वेगळे, तिकीट वेगळी आणि ज्या साहसी खेळाचा आनंद लुटायचा आहे त्याचे वेगळे पैसे. एकूण ह्याचा खर्च बघता सामान्य माणसाच्या खिशाला हे परवडण्यासारखे नाही इतकी याची तिकीट आहे. तरी सामान्य माणूस काटकसर करून एक दिवस तरी आपल्या मुलांना येथे घेऊन जातो. एका आनंद मेळ्याचा एका सत्राचा गल्ला हा 40 ते 50 लाखांचा आहे. इतकी बक्कळ कमाई यातून केली जाते.

 

परवानगी मिळण्याआधीच मेळा सुरू

चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंड येथे 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत आनंद मेळा होणार होता. तो सुरू करण्यासाठी महानगरपालिका, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि जिल्हा सामान्य प्रशासन विभागाकडून याची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय हा मेळा सुरू करता येत नाही. त्यातही जिल्हा सामान्य प्रशासन विभागाची परवानगी अतिमहत्त्वाची आहे. सर्वांची परवानगी घेतल्यानंतरच आणि त्याची पडताळणी केल्यानंतरच जिल्हा सामान्य प्रशासन विभाग याची परवानगी देते. मात्र याची पडताळणी करण्यात आली नाही. असे असताना आनंद मेळा सर्रासपणे सुरू आहे. मेळा संपण्यासाठी केवळ दहा दिवस उरले आहेत तरी परवानगी मिळण्याची प्रकिया पूर्ण झालेली नाही.

 

मेळ्याच्या मालकाकडून खोटे कागदपत्रे सादर

आनंद मेळा हा सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित असावा यासाठी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळण्यासाठी लायसन्स एजन्सीचे फॉर्म A प्रमाणपत्र, त्रयस्थ एजन्सीकडून फायर ऑडिट रिपोर्ट, ज्या ठिकाणी हा आनंदमेळा होणार आहे त्याचा संपूर्ण नकाशा जोडावा लागतो. नागपुरातील आकाश अम्यूजमेंट कंपनीकडून चंद्रपूर महोत्सव मेलाचे मुख्य कार्यवाह रामपाल सेवाराम सिंह यांनी 30 ऑक्टोबरला परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र यापैकी आवश्यक कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली नाही. फायर ऑडिट रिपोर्ट त्यांनी जोडली नाही, जो जागेचा नकाशा दिला तो खोटा दिला. नकाशावर जलील बाबा दर्गा दाखवण्यात आला जो चंद्रपूर शहरात नाही. कागदपत्रे पूर्ण नसताना त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला नाही. उलट हा मेळा सुरू झाला असताना त्याकडे डोळेझाक करण्यात आली.

 

जिल्हा सामान्य प्रशासन विभागातही तेच

हीच कागदपत्रे जिल्हा सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली. त्याची पडताळणी देखील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाही यांत्रिकी विभागाची परवानगी मिळाली नसताना देखील हा मेळा सुरू करण्यात आला.

 

प्रशासनाचे झोपेचे सोंग

आनंद मेळा सुरू करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात अर्ज सादर करण्यात आला होता. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान हा मेळा सुरू असण्याचे स्पष्ट असताना आणि त्यापूर्वी परवानगी घेण्याची पूर्तता झाली नसताना हा आनंद मेळा सुरू कसा झाला याची शहानिशा करण्याची तसदी प्रशासनातील एकही अधिकारी कर्मचाऱ्याने घेतली नाही.

 

भ्रष्ट यंत्रणा आणि दलालांची टोळी

केवळ या आनंद मेळ्याची ही गोष्ट नाही तर यापूर्वी झालेल्या अनेक आनंद मेळ्यात ही भ्रष्ट शासकीय यंत्रणा या मागे होती. त्यासाठी चंद्रपूर शहरात काही दलाल लोक सक्रिय असून ते जिल्हा प्रशासनाकडून सर्व परवान्यांचे आपण बघून घेतो याची हमी देतात. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी देखील यासाठी चांगलीच मागणी करतात. याची पूर्तता झाली की परवानगी नसताना देखील मेळा सुरू करण्याची मुकसंमती देतात. मात्र हे धोकादायक असून भविष्यात कुठलीही मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार संपूर्णता प्रशासनाची भ्रष्ट यंत्रणा असणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!