Municipal Corporation Meeting : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज रविवारी महानगरपालिकेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनात्मक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. (हे वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)
या बैठकीला नव्याने रुजू झालेले मनपा आयुक्त नरेश अकनुरी यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महामंत्री मनोज पाल, रवी गुरुनुले, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, बलराम डोडाणी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, कल्पना बबुलकर, ॲड. राहुल घोटेकर, राजेंद्र अडपेवार आदींची उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान शहराच्या विकासाशी निगडित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा विषय, महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे देण्याचा प्रश्न तसेच भिवापूर हनुमान खिडकी परिसरातील झरपट नदीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
आगामी काळात चंद्रपूर शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामे अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांशी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.










