ब्रम्हपुरी (चंद्रपूर): Brahmapuri Theft Case मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हळदा येथे घरासमोरील अंगणातून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या आंतरतालुका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करून ३.६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टाटा एस आणि मोटरसायकलसह चोरीचा संपूर्ण माल पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. ब्रम्हपुरी पोलिसांची ही तत्परता गुन्हेगारांसाठी मोठा इशारा मानला जात आहे. (चंद्रपुरात बनावट सुगंधित तंबाखूचा कारखाना, LCB ची धाड)
अंगणात ठेवलेले साडेतीन लाखांचे साहित्य गायब
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जून २०२६ रोजी फिर्यादी गणेश बाळकृष्ण मिसार (वय ३६ वर्षे, रा. नान्होरी, ता. ब्रम्हपुरी), जे व्यवसायाने इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदवली. त्यांनी आपले काही इलेक्ट्रिक साहित्य जसे की, अंदाजे २ कि.मी. अंतराचा इलेक्ट्रिक कंडक्टर (किंमत रु. ५०,०००/-), ५० किलोग्रॅम वजनाची स्टे-वायर (किंमत रु. ५,०००/-) आणि ५० किलोग्रॅम वजनाची जी.आय.वायर (किंमत रु. ५,०००/-), असे एकूण ६० हजार रुपयांचे साहित्य हळदा येथील रहिवासी मुन्ना भोयर यांच्या घरासमोरील अंगणात ठेवले होते.
Brahmapuri Theft Case मध्ये मोठी पोलिस कारवाई
दरम्यान, तोंडाला दुप्पटे (रुमाल) बांधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी हे संपूर्ण साहित्य चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१९/२०२६ नुसार नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवली.
संशयावरून चौकशी अन् गुन्ह्याची कबुली
ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजबे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयावरून राकेश उर्फ गोलू देवराम भोयर (रा. नान्होरी) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्याने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तीन आरोपींना अटक, मुद्देमाल हस्तगत
राकेश उर्फ गोलू भोयर याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या इतर दोन साथीदारांना तात्काळ ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) राकेश उर्फ गोलू देवराम भोयर (रा. नान्होरी, ता. ब्रम्हपुरी)
२) मयुर उर्फ गोलू गोकुलदास शेंडे (वय २५ वर्षे, रा. नान्होरी, ता. ब्रम्हपुरी)
३) विजयकुमार अशोक मेडपल्लीवार (वय ३८ वर्षे, रा. सिंगापूर, पोस्ट- कवठी, ता. सावली, जि. चंद्रपूर)
आरोपींची धरपकड केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत केला. तसेच चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेली टाटा एस (क्रमांक MH 34 BZ 0017, किंमत अंदाजे ३,००,०००/- रु.) आणि गुन्ह्यात वापरलेली डिलक्स मोटरसायकल (क्रमांक MH 34 BY 9508, किंमत अंदाजे ४०,०००/- रु.) जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस प्रशासनाची कामगिरी
सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) श्री. दिनकर ठोसरे आणि ब्रम्हपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे (DB Team) सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रम्हपुरी पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.