शेगाव: Shegaon Black Magic Case प्रकरणामुळे वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक गावात खळबळ उडाली आहे. घरासमोर वारंवार जादुटोण्याचे साहित्य टाकून कुटुंबात भीती निर्माण केल्याचा आरोप शेजाऱ्यावर करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटल्याचा दावा फिर्यादीने केला असून जाब विचारण्यासाठी गेल्यावर मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. (गोपनीय माहिती आणि जुगार अड्डा उध्वस्त)
घरासमोर सतत जादुटोणाचे साहित्य टाकून कुटुंबात दहशत निर्माण करणाऱ्या आणि जाब विचारण्यास गेल्यावर अश्लील शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या मायलेकाविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक येथील मठ वार्डात शनिवार, २० जून २०२६ रोजी उघडकीस आली. याप्रकारामुळे परिसरात खळबळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मठ वार्ड शेगाव बुद्रुक येथील रहिवासी सागर नंदकिशोर निखाते (वय २७) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराशेजारीच स्वप्नील विलास निखाते हा राहतो, परंतु पूर्ववैमनस्यामुळे दोन्ही कुटुंबात बोलचाल बंद आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सागर यांच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि कंपाऊंडच्या आत प्रत्येक अमावास्या व पूर्णिमेला काळी बाहुली, कापलेले लिंबू, सागर यांच्या फोटोवर खिळे मारलेले साहित्य, कागदातील हळद-गुलाल-बुका, चार खडे आणि पळसाच्या पानावरील जादुटोणाचे साहित्य कोणीतरी टाकत होते.
Shegaon Black Magic Case मध्ये नेमके काय घडले?
शनिवार, २० जून २०२६ रोजी रात्री १:३० वाजताच्या सुमारास सागर यांनी आपल्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शेजारी राहणारा स्वप्नील निखाते हाच हे जादुटोणाचे साहित्य तिथे टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. स्वप्नीलने केवळ सागर यांच्याच नव्हे, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सौ. रंजना मंगेश तलसे यांच्या घरासमोरही असेच साहित्य टाकून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
या गंभीर प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी २० जून २०२६ रोजीच सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास सागर, त्यांची आई, बहीण आणि पत्नी हे स्वप्नीलच्या घरासमोर गेले. त्यांनी स्वप्नीलची आई रेणुका विलास निखाते हिला मुलाच्या या कृत्याबद्दल विचारणा केली. यावरून संतप्त होऊन रेणुका निखाते हिने त्यांना मारण्यासाठी हातात चप्पल घेतली, तर स्वप्नील निखाते याने सागर यांच्या आईला ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दोन्ही आरोपींनी फिर्यादीला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून ‘तुला पाहून घेईन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या जादुटोण्यामुळे आणि धमक्यांमुळे संपूर्ण निखाते कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले.
याप्रकरणी सागर नंदकिशोर निखाते यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी २० जून २०२६ रोजी रात्री २१:४५ वाजता आरोपी स्वप्नील विलास निखाते आणि रेणुका विलास निखाते यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ३ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२), २९६, ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा (प्रथम खबर क्रमांक ०२१०/२०२६) दाखल केला आहे. शेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






