जिवती (चंद्रपूर): Jiwati Women Action मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गुडसेला गाव राज्यभर चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या अवैध देशी दारूविक्रीविरोधात महिलांनी थेट दारू अड्ड्यावर धडक देत मोठी कारवाई केली. महिलांनी दारूचा साठा जप्त करून जागेवरच त्याची होळी केली. पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे गावातील महिलांनी हा कठोर निर्णय घेतला. (सोनं गहाण ठेवत पैसे गुंतविले, झाली लाखोंची फसवणूक)
संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आणि तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अवैध दारूविक्री विरोधात अखेर महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट रणरागिणीचे रूप धारण केले. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुडसेला या गावात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या अवैध देशी दारूविक्रीविरुद्ध गावातील महिलांनी थेट दारू अड्ड्यावर धडक देऊन दारू जप्त केली आणि तिची होळी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. २२ जून रोजी घडलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Jiwati Women Action मुळे गुडसेला गावात खळबळ
गुडसेला गावात मागील वर्षभरापासून कैलास वाघमारे आणि सिंधुताई पवार हे दोघे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री करत होते. या अवैध व्यवसायामुळे गावातील शांतता पूर्णपणे भंग पावली होती. घरातील पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेल्याने अनेक सुखी संसार दारूच्या पुरात वाहून चालले होते, तर दुसरीकडे गावातील अल्पवयीन मुले आणि तरुण पिढीही या व्यसनाच्या आहारी जाऊन बिघडत चालली होती.
गावातील ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती पाहून महिलांनी सुरुवातीला सनदशीर मार्गाने लढा देण्याचे ठरवले. महिलांनी जिवती पोलीस स्टेशन गाठून या अवैध दारूविक्री विरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या मध्यस्थीने या दारू विक्रेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र पोलिसांच्या इशाऱ्याला आणि समजावण्याला केराची टोपली दाखवत या विक्रेत्यांनी आपली अवैध दारूविक्री उद्धटपणे सुरूच ठेवली होती.
वारंवार विनंती करूनही दारू विक्रेते ऐकत नसल्याने आणि पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून अखेर गावातील महिलांनी स्वतःच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. महिलांनी प्रथम जिवती पोलीस स्टेशन गाठून ठाणेदारांना निवेदन दिले आणि गावातील अवैध दारू तात्काळ बंद करण्याची आर्त विनंती केली. त्यानंतर, कोणताही विलंब न करता गावातील शेकडो महिलांचा जनसमुदाय थेट दारूविक्रीच्या मुख्य अड्ड्यावर धडकला. महिलांचा हा आक्रमक अवतार पाहून दारू विक्रेत्यांची भंबेरी उडाली.
महिलांनी तातडीने तेथील अवैध दारूचा साठा शोधून काढून तो जप्त केला. केवळ दारू जप्त करून महिला थांबल्या नाहीत, तर त्यांनी त्या सर्व दारूची जागेवरच जाहीर होळी करून अवैध धंदेवाल्यांना कडक इशारा दिला. या धाडसी कारवाईच्या वेळी गुडसेला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या या थेट आणि आक्रमक पवित्र्यामुळे आतातरी जिवती पोलीस प्रशासन जागे होऊन संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






