चंद्रपूर (राजुरा): Rajura Bicycle Theft प्रकरणात राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन तरुणांना अटक केली. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीतून चोरलेल्या १० सायकली पूर्णपणे जप्त करण्यात आल्या आहेत.
राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीमधून हजारो रुपयांच्या सायकली चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी. स्कॉड) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (लोकवर्गणीतून खरेदी केलेल्या सायकलची चोरी)
Rajura Bicycle Theft प्रकरणात दोन आरोपींना अटक
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी किशोर लालाजी उईके (वय ५५ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. आंबेडकर वार्ड, राजुरा) यांनी १२ जून २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार दाखल केली होती. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या १० सायकली सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, दिनांक २५ जून २०२६ रोजी सायंकाळी १७:०० वाजता ते ११ जून २०२६ रोजी १८:०० वाजताच्या दरम्यान कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने शाळेच्या आवारात बेकायदेशीररी्या प्रवेश करून तिथून ३,००० रुपये प्रति सायकल प्रमाणे एकूण ३०,००० रुपये किमतीच्या सर्व १० सायकली चोरून नेल्या. या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून राजुरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५४५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवून तपासात घेण्यात आला होता.
शाळेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलींची चोरी झाल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या थेट नेतृत्वाखाली डी.बी. इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. तपास चक्रे वेगाने फिरवत असतानाच, पोलिसांच्या गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी चुनाळा (ता. राजुरा) येथील दोन संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १) सौरभ चंद्रसुभाष वडस्कर (वय १९ वर्षे, रा. इंदिरा नगर, चुनाळा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) आणि २) यश सुधाकर वाढरे (वय २२ वर्षे, रा. चुनाळा, ता. राजुरा) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून जिल्हा परिषद शाळेतून चोरीला गेलेल्या सर्व १० सायकली (किंमत ३०,००० रुपये) जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपींवर अपराध क्रमांक ५७३/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.
सदर धडाकेबाज कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार यांच्या मुख्य मार्गदर्शनात पार पडली. तसेच या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोलीस अंमलदार महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






